Perth Scorchers Winner : पर्थ स्कॉर्चर्सने रचला इतिहास! सिडनी सिक्सर्सला धूळ चारत सहाव्यांदा कोरलं जेतेपदावर नाव
Perth Scorchers Winner : पर्थ स्कॉर्चर्सने बीबीएलमध्ये ६ जेतेपदांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला असून एमआय आणि सीएसकेला मागे टाकले

Perth Scorchers Winner of BBL 2026 : बिग बॅश लीग २०२५-२६ च्या थरारक अंतिम सामन्यात पर्थ स्कॉर्चर्सने सिडनी सिक्सर्सचा एकतर्फी पराभव करत सहाव्यांदा चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला आहे. पर्थ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्कॉर्चर्सने आपल्या घरच्या मैदानावर वर्चस्व राखत विजयाचा गुलाल उधळला. या जेतेपदासह पर्थ स्कॉर्चर्सने टी-२० इतिहासात सर्वाधिक जेतेपदे जिंकण्याच्या बाबतीत आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स (प्रत्येकी ५ जेतेपदे) या दिग्गज संघांना मागे टाकले आहे.
पर्थच्या गोलंदाजांसमोर सिडनीची दाणादाण –
नाणेफेक जिंकून पर्थ स्कॉर्चर्सने प्रथम गोलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. पर्थच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत सिडनी सिक्सर्सच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. सिडनीचा संघ २० षटकांत अवघ्या १३२ धावांवर गारद झाला. अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथसह जोश फिलिप आणि मोइसेस हेन्रिक्स यांना प्रत्येकी २४ पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. पर्थकडून झाय रिचर्डसन आणि डेव्हिड पायने यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या, तर युवा वेगवान गोलंदाज महली बीयर्डमनने २ गडी बाद केले.
मिचेल मार्श आणि फिन ॲलनचा तडाखा –
THE PRIDE OF PERTH 🧡
For a record sixth time, the Perth Scorchers are BBL champions 🏆 #BBL15 pic.twitter.com/ncqChsq9Ay
— KFC Big Bash League (@BBL) January 25, 2026
१३३ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पर्थ स्कॉर्चर्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. सलामीवीर फिन ॲलन (३६ धावा) आणि मिचेल मार्श (४४ धावा) यांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी करून विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यानंतर जोश इंग्लिसने नाबाद २९ धावांची संयमी खेळी करत १७.३ षटकांतच संघाला ६ विकेट्सनी विजय मिळवून दिला.
जगातील सर्वात यशस्वी टी-२० संघ –
पर्थ स्कॉर्चर्सने बीबीएलमध्ये ६ जेतेपदांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला
| संघ | लीग | जेतेपदे |
| पर्थ स्कॉर्चर्स | BBL | ६ |
| मुंबई इंडियन्स | IPL | ५ |
| चेन्नई सुपर किंग्स | IPL | ५ |
| ट्रिनबागो नाइट रायडर्स | CPL | ५ |
या विजयामुळे पर्थ स्कॉर्चर्स आता जगातील सर्वात यशस्वी टी-२० फ्रँचायझी बनली आहे. त्यांनी ६ वेळा बिग बॅश लीगचे विजेतेपद पटकावून एक नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.





