पुणे जिल्हा | पेरिविंकल स्कूलने जपले पर्यावरण रक्षणाचे हित

पिरंगुट, (वार्ताहर) – बावधनच्या पेरिविंकल स्कूलने पर्यावरण रक्षणाचे राष्ट्रीय व सामाजिक हित जपले आहे, असे प्रतिपादन वन परिक्षेत्र कार्यालय मुळशीचे अधिकारी संतोष चव्हाण यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पेरीविंकल स्कूल बावधनच्या विद्यार्थ्यांनी पेरिविंकल स्कूल ते बावधन वन उद्यान येथे पर्यावरण संवर्धन जनजागृती रॅली काढण्यात आली. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे घोषवाक्ये दिली. बावधन वन उद्यानात विविध वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी बावधन वन उद्यानात वनपरिक्षेत्र कार्यालय मुळशीचे अधिकारी संतोष चव्हाण, पौड परिमंडळ अधिकारी नंदकुमार शेलार, वन परीक्षक सारिका दराडे, पेरिविंकल स्कूल बावधनच्या संचालिका रेखा बांदल व इतर कर्मचारी उपस्थित होते. तसेच नंदकुमार शेलार यांनी विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या मोकळ्या परिसरात जास्तीत जास्त झाडे लावण्याचे आवाहन केले.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संचालक राजेंद्र बांदल यांनी वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना मातीशी ऋणानुबंध जोडून ठेवण्याचा मोलाचा संदेश दिला. तसेच पेरिविंकलची विद्यार्थिनी तन्वी बाल्पत्की हिने या दिवसाचे महत्त्व सांगितले. या कार्यक्रमाचे नियोजन बावधन शाखेच्या मुख्याध्यापिका प्रिया लढ्ढा यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका इंदू पाटील, कल्याणी शेळके तसेच क्रीडा शिक्षक व इतर शिक्षकवृंद यांनी केले.





