Pune News : बावधनच्या पेरिविंकल स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

बावधन : चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल, बावधन येथे गुरुपौर्णिमेचा सांस्कृतिक व अध्यात्मिक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि श्रद्धेने साजरा झाला. गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.
प्रसिद्ध वक्त्या व अध्यात्मिक मार्गदर्शिका राजश्री माझीरे यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थिती लावली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, दीपप्रज्वलन आणि पाद्यपूजनाने झाली. माझीरे यांनी गणित आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम सांगताना छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील गुरुंच्या भूमिकेची उदाहरणे दिली.
विद्यार्थ्यांनी महर्षी व्यास आणि चार वेदांचा उगम यावर आधारित नाट्य सादरीकरण केले, ज्याने सर्वांचे मन जिंकले. संस्कृत श्लोक, गुरुस्तुतीच्या कविता आणि “गुरु-शिष्य परंपरा: काल आणि आज” या विषयावरील निबंध स्पर्धेने कार्यक्रमाला सांस्कृतिक रंगत आणली. प्री-प्रायमरी विभागातील चिमुकल्यांनी ‘आई’ या पहिल्या गुरुचे पूजन करून सर्वांना भावूक केले.
शाळेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी कवी कालिदासाच्या जीवनातील गुरुंचे महत्त्व विशद केले. संचालिका रेखा बांदल, शिवानी बांदल आणि मुख्याध्यापिका शुभदा कोलते यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पर्यवेक्षिका प्रज्ञा जोशी, समन्वयिका सायली गायकवाड आणि शिरीन काझी यांनी केले.
हा मूल्याधारित आणि संस्कृतीशील सोहळा विद्यार्थ्यांमध्ये गुरुभक्ती, शिस्त आणि आदरभाव जागवणारा ठरला. पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे भरभरून कौतुक केले.





