पोलादाचा दरडोई वापर वाढणार

पुणे – एखाद्या देशाचा आर्थिक विकास किती वेगाने होत आहे हे पोलादाच्या दरडोई वापरावरून स्पष्ट होते. भारतामध्ये पोलादाचा वापर वाढत आहे आणि आगामी काळात तो वाढण्याची शक्यता आहे.
भारतामध्ये रस्त्याचे आणि घराचे बांधकाम आगामी काळात वेगाने वाढणार आहे. त्याचबरोबर कॉरिडॉर प्रकल्प आकारास येत आहेत. या कारणामुळे पोलादाचा दरडोई वापर वाढणार असल्याचे केंद्रीय पोलाद मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.
ते म्हणाले की, केवळ मोठे प्रकल्प सुरू करण्यात आलेले नाहीत तर, हे प्रकल्प वेगाने पूर्णत्वास जावे याकरिता ईज ऑफ डुईंग बिझनेस ही संकल्पना वेगाने राबविण्यात येत आहे. त्यामुळे भारतात उद्योग करणे अधिक सुलभ झाले असल्याचे जागतिक बॅंकेच्या अहवालात नमूद केले असल्याचे त्यांनी सांगितले. दिवाळखोरी आणि नादारी यंत्रणा कार्यान्वित करणे, जीएसटी लागू करणे व कंपनीकरात कपात केल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. त्याचबरोबर पायाभूत प्रकल्प आकारास येणार आहेत. त्यामुळे भारतातील पोलादाचा वापर वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचा केवळ भारतातील पोलाद कंपन्यांनाच लाभ होणार नाही तर, पोलादाची प्रसंगी आयात करावी लागेल असे त्यांनी सांगितले.
गेल्या 5 वर्षांमध्ये भारतातील पोलाद उद्योगात अधिक कार्यक्षम, पर्यावरणपूरक आणि स्पर्धात्मक झालेला आहे. भारताला 5 वर्षांमध्ये अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलरची करायची आहे. त्याचाच भाग म्हणून पोलाद क्षेत्रावर अधिक भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. “मेक इन इंडिया’मुळे वस्तू उत्पादन क्षेत्राला चालना मिळालेली आहे. या क्षेत्रामध्ये पोलादाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. त्यामुळेही दरडोई पोलाद वापर वाढण्यास मदत मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.





