आधार नसणारे लोक निर्धार मेळावे घेतात : आ. पाटील

उंब्रज – आधार नसणारे लोक निर्धार मेळावे घेऊन मला निष्क्रिय म्हणतात. प्रथम निष्क्रियचा अर्थ समजावून घ्या व गतवेळी आपण दीडशे कोटीची वल्गना केली होती त्या कामांचे काय हे अगोदर कराड उत्तरच्या जनतेला सांगा. मगच दुसऱ्यांवर बोला अशी परखड टीका आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली.

उंब्रज ता. कराड येथे विविध विकासकामांचे उद्‌घाटन व भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, विनिता पलंगे, सुरेखा जाधव, सुषमा नागे, लता कांबळे, पै. अजित जाधव, सोमनाथ जाधव, प्रमोद पुजारी उपस्थित होते.

आमदार पाटील म्हणाले, आपण सदैव चव्हाण साहेबांच्या विचारांची पाठराखण करत आलो आहोत. विरोधक टीका करत आहेत की मी काय काम केले, मात्र तुम्ही तुमची जागा तपासा तुम्ही पाच वर्षात पश्‍चिम महाराष्ट्रात किती विकासाची कामे आणली. युतीच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केल्या. मात्र यावर मुख्यमंत्री महोदय काही बोलायला तयार नाहीत. मग अशा लोकांच्या पाठीशी हा महाराष्ट्र जाणार का? असा प्रश्‍न उपस्थित केला.
यावेळी मानसिंगराव जगदाळे, हंबीरराव जाधव, जयवंतराव साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत डी. बी. जाधव यांनी केले सूत्रसंचालन प्रा. अजय जाधव यांनी केले तर आभार सोमनाथ जाधव यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.