Sangli News | सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावातील एका तरुण कंत्राटदाराने आत्महत्या केली आहे. हर्षल पाटील असे या ३५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले होते. मात्र थकीत बिल न मिळाल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले. यावरून विरोधकांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करत लिहिले की, सरकारच्या लोकप्रिय योजनांमागचे असंवेदनशील वास्तव वाळवा तालुक्यातील एका मेहनती तरुणाची आत्महत्या असे म्हटले आहे. “हर्षल पाटील हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातल्या तांदुळवाडी गावचा एक कष्टाळू, तरुण कंत्राटदार होता. त्याने सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये पाणी पोहोचवण्याचं काम पूर्ण केले. त्याने कामाचे बिल दिले. पण, बिचाऱ्याला पैसे मिळालेच नाहीत, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. हर्षल पाटीलची सरकारकडे १ कोटी ४० लाख इतकी थकबाकी होती. पैसे मिळत नाहीत म्हणून त्याने ६५ लाखांचे कर्ज काढले. शेवटी आर्थिक तणावात येऊन फास घेऊन स्वतःचे आयुष्य संपवले. पाठीमागे पत्नी, लहान मुलगी, वृद्ध आई-वडील, आणि दोन लहान भाऊ यांना ठेवून गेला,” असे आव्हाड म्हणाले. Sangli News | सरकारकडे बिल देण्यासाठी पैसेच नाहीत ‘लाडकी बहीण योजना’ ही एक लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी योजना नाही. एकीकडे या योजनेसाठी सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी बाजूला काढला. राज्यावर कर्जाचा बोजा वाढवला. दुसरीकडे मात्र जिल्हा परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिल अडवली गेली आहेत. कारण राज्य सरकारकडे ही बिले देण्यासाठी पैसेच नाहीत, असा दावा आव्हाड यांनी केला आहे. ….ही गोष्ट गांभीर्याने घेण गरजेचं “मी मागे म्हणालो होतो, ‘काही महिने जाऊ द्या..कितीतरी कंत्राटदार आत्महत्या करतील.’ दुर्दैवाने त्याची सुरुवात झाली आहे. आज हर्षल पाटील गेलाय, पण उद्या अजून किती जण या दुर्दैवी फेऱ्यात अडकतील, याची कल्पनाच न केलेली बरी. हे केवळ आर्थिक संकट नाही, तर प्रशासकीय अपयश देखील आहे. निवडणुका जिंकण्यासाठी लोकांना मोफत सुविधा द्यायच्या, पण त्या माग आवश्यक असणारा आर्थिक ताळेबंद साधायचा नाही. हर्षल पाटील यांची आत्महत्या ही केवळ एक वैयक्तिक दु:खद घटना नाही. ती एक इशारा आहे. राज्य शासन, प्रशासन आणि समाजाने ही गोष्ट गांभीर्याने घेण गरजेचं आहे,” असेही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. Sangli News | जयंत पाटील यांची पोस्ट – तर जयंत पाटील यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची पोरं कंत्राटदारीकडे वळली. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर आपलं विश्व निर्माण करु पाहणाऱ्या युवकांच्या स्वप्नावर सरकारने पाणी फेरले. राज्य शासनाने निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीत पैसे नसतांना विविध कंत्राटांचे वाटप केले. आज थकलेली बिले घेण्यासाठी राज्यातील कंत्राटदार सरकारच्या दारात याचना व आंदोलने करत आहेत. ही एका खात्याची परिस्थिती नसून, सर्वच खात्यांची परिस्थिती आहे. एका कंत्राटदारावर केवळ एक घर चालत नसून त्याच्यावर अनेक कामगारांची कुटुंबे सुद्धा अवलंबून असतात, याचे सरकारला कसलेही भान राहिलेले नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांप्रमाणे कंत्राटदारांच्या आत्महत्यांची मालिका सुरु होईल अशी मला भीती वाटते. या परिस्थितीवर सरकारने तात्काळ तोडगा काढावा”, असे आवाहन जयंत पाटील यांनी केलं आहे. काय आहे प्रकरण ? हर्षल पाटीलने कंत्राटदार म्हणून राज्य सरकारच्या जल जीवन मिशन योजनेत सुमारे एक कोटी 40 लाखांचे काम केले होते. यासाठी त्याने हात उसने पैसे घेतले आणि सावकाराकडून कर्ज काढले होते. पण एक वर्ष होऊनही राज्य सरकारकडून पैसे मिळत नव्हते. त्यामुळे नैराश्य आल्याने त्याने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. Sangli News | हेही वाचा : Pune : समाविष्ट गावांच्या अडचणी काही संपेनात; २३ गावांचा सांडपाणी प्रकल्प लटकणार