Satara | कराड उत्तरची जनता विरोधकांना माफ करणार नाही – आ. प्रवीण दरेकर

नागठाणे, (प्रतिनिधी) – पवार साहेब 40-45 वर्षे तुमच्याकडे सत्ता होती. त्यावेळी या कराड उत्तरमध्ये चांगले उद्योग व्यवसाय आणू शकला नाही. आता लोकांना आश्वासन देता आम्ही रोजगार देऊ. तुमच्या नेतृत्वात येथे 25 वर्ष कराड उत्तरला एकच आमदार राहिला तरीही समस्या सोडवता आल्या नाहीत. आता तुम्ही काही करण्याची गरज नाही कारण जनतेने निवडणूक हातात घेतली आहे.परिवर्तनाची लाट येथे मला दिसते आहे. तुमच्या इथल्या आमदारांनी सहकारात काम केलं पण त्यांच्या सह्याद्री साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकर्यांची पिळवणूक सुरू आहे. वेळेवर ऊस नेला जात नाही. संस्थेचा सभासद हा संस्थेचा मालक असतो. मात्र, तुम्ही त्यांचे माफीनामे लिहून घेतले. आता जनता तुम्हाला माफ करणार नाही, माफीनामा लिहून दिला तरी माफ करणार नाहीत, अशी टीका आ. प्रवीण दरेकर यांनी केली.
रहिमतपूर, ता. कोरेगाव येथे महायुतीचे उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, चित्रलेखा माने कदम, भीमराव पाटील, आरपीआयचे अशोकराव गायकवाड, माजी नगराध्यक्ष संपतराव माने, शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंत शेलार, चंद्रकांत जाधव, सचीन नलवडे, सचीन बेलागडे, सुखदेव माने, वासुदेव माने, निलेश माने, राजेश घाडगे, सरपंच परिषद सतीश इंगवले, समृध्दी जाधव, सुनील काटकर उपस्थित होते. आ. प्रवीण दरेकर म्हणाले, 25 वर्ष कराड उत्तरच्या जनतेला भूलथापा दिल्या गावोगावची पाणी प्रश्न, रस्ते, मूलभूत सुविधा देता आले नाहीत. आता मी पाच वेळा निवडून आलो आहे आता षटकार मारणार असं बाळासाहेब पाटील तुम्ही म्हणता. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी आता यॉर्कर टाकला आहे. तुमच्या दांड्या गुल केल्याशिवाय महायुतीचे मनोज घोरपडे गप्प बसणार नाहीत. कराड उत्तरच्या विकासासाठी जनतेने मनोज घोरपडेंना 50 हजाराच्या मताच्या लीडने निवडून द्यावे.
महाराष्ट्रामध्ये माता भगिनींचा सन्मान वाढवण्याचे काम महायुती सरकारने केले. पंरतु, टीका करणार्या उद्धव ठाकरे यांना दीड हजाराची किंमत कळणार नाही. महायुती सरकार हे संवेदनशील सरकार आहे विकास करणारे सरकार आहे. आपली अस्मिता जपणारे सरकार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत दरेकर म्हणाले, छत्रपतींचे वंशज आमच्या व्यासपीठावर आहेत. तुम्ही फक्त छत्रपतींचे नाव घेता मात्र तुम्हाला छत्रपती कळले नाहीत. खासदार उदयनराजे म्हणाले, प्रत्येकाने लोकांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला पाहिजे. पंरतु, अमोल कोल्हे तुम्ही लाडकी बहीण योजनेवर बोलताना टीका केली. त्यावेळी लाज वाटायला पाहिजे, तुम्ही माता-भगिनींचा कधी विचार केला का? प्रगतीच्या मार्गाने चालणार्या पक्षाबरोबर बरोबर येण्याचा एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी चांगला निर्णय घेतला. विचाराने एकत्र आलेली महायुती आहे. 55 वर्षे सत्तेत होता तेव्हा लोकांच्या भावनांशी खिलवाड केला. यावेळी मनोजदादा बॅट अशी धरुन षटकार मारा की हे आमदार मतदारसंघाच्या बाहेर फेकले गेले पाहिजेत.
पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, सत्तेचा वापर कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी केला. पालकमंत्री म्हणून जिल्ह्याला न्याय देण्याचे काम केले. सातारा जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी विकासासाठी निधी देता येईल त्यासाठी प्रयत्न केले. रहिमतपूर विभागातही विकासासाठी निधी देण्यात यश आले. महायुती हे मजबूत सरकार असून या सरकारने अनेक कामे केली आहेत. जी जनतेच्या फायद्याची ठरली असून या निवडणुकीत महायुतला मोठे यश मिळणार आहे. मनोज घोरपडे म्हणाले, 25 वर्षे कराड उत्तरची जनता इथल्या बिनकामाच्या आमदाराला घरी बसवण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता लोकांनीच ही निवडणूक हातात घेतली असून बिनकामाचा निष्क्रिय आमदार उत्तर कराड मधून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. संपतराव माने म्हणाले, कराड उत्तरचा आमदार नाकर्ता आहे. एक काम करू शकलेले नाही, त्यांना सांगायला काम नाही. चित्रलेखा माने म्हणाल्या परिवर्तनाचे वादळ कराड उत्तरमधे आहे. अशोकराव गायकवाड, राजेश घाडगे, सरपंच परिषद कार्याध्यक्ष सतीश इंगवले, शारदा जाधव, सचिन नलवडे यांनी मनोगत व्यक्त केले.
मनोज घोरपडे यांचा विजय निश्चित : धैयशील कदम
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम म्हणाले 2009 पासून कराड उत्तरची जनता परिवर्तनाच्या प्रतिक्षेत आहे. पंरतु मतांची विभागणी होवून इथल्या निष्क्रिय आमदारांना त्याचा फायदा झाला. पंरतु यावेळी आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेवून एकास एक लढत दिली. कमळ चिन्ह दिले. मनोज घोरपडे यांच्या पाठीमागे कराड उत्तर मधील महायुती घटक पक्ष मोठ्या ताकतीने उभा आहे. त्यामुळे मनोज घोरपडे यांचा विजय निश्चित आहे.





