Modi government : ‘जनतेला दावे नकोत, महागाईवर नियंत्रण हवे आहे’; काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
जनतेला सरकारचे पोकळ दावे आणि आश्वासने नकोत, तर महागाईवर प्रभावी नियंत्रण हवे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारला धारेवर धरले आहे.

Modi government – वाढत्या महागाईवरून काँग्रेसने गुरुवारी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जनतेला सरकारचे पोकळ दावे आणि आश्वासने नकोत, तर महागाईवर प्रभावी नियंत्रण हवे आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, दूध, तांदूळ, पीठ, डाळी, खाद्यतेल, कांदा, बटाटा, टोमॅटो, साखर, तूप आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. त्यातच अमूल आणि मदर डेअरीने पुन्हा एकदा दुधाच्या दरात वाढ केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना जयराम रमेश म्हणाले, अच्छे दिनांचे आश्वासन दिले होते, पण प्रत्येक दिवस महागाईचा नवा धक्का घेऊन येत आहे. मोदी सरकारच्या धोरणांनी गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर वारंवार डल्ला मारला आहे.
महागाईविरोधात मते मागून सत्तेवर आलेल्या मोदानी सरकारमध्ये महागाईचे गणित असे काही मांडले आहे की, याचा सर्व भार केवळ देशातील मध्यम आणि गरीब वर्गालाच सोसावा लागत आहे.
स्वयंपाकघरापासून ते दैनंदिन वापराच्या वस्तूंपर्यंत रोज होणाऱ्या दरवाढीमुळे प्रत्येक घराचे बजेट कोलमडले आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधानांना टोला लगावताना रमेश पुढे म्हणाले की, पंतप्रधान, तुम्ही एकदा म्हणाला होतात – सब चंगा सी (सर्व काही ठीक आहे), पण आता परिस्थिती अशी आहे की – सब महंगा सी.
सरकार खोट्या दाव्यांच्या आडून जनतेचे खिसे अजून किती काळ कापणार आहे, असा प्रश्न देशवासीयांना पडला असल्याचे सांगत, महागाईला प्रभावीपणे लगाम घालण्याची मागणी जयराम रमेश यांनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे.





