मोदींना जनता गांभीर्याने घेत नाही; कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची टीका

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी वापरलेल्या शब्दांवरून त्यांच्या नैराश्याची प्रचिती आली. जनतेलाही आता मोदींच्या नैराश्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेतले जात नाही, असे टीकास्त्र राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांनी बुधवारी सोडले.
लोकसभेतील भाषणावेळी मोदींनी कॉंग्रेस आणि राहुल यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला. त्यांनी राहुल यांचा उल्लेख बालक बुद्धी असणारी व्यक्ती म्हणून केला. त्या टीकेचा समाचार गेहलोत यांनी सोशल मीडियावरून घेतला. मोदींना पदाची आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेची चिंता नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून जाणवते.
लोकसभा निवडणुकीवेळी राजस्थानमधील एका सभेत मोदींनी मंगळसूत्र, घुसखोर यांसारखे शब्द वापरले. ते भाषण नकारात्मक दृष्टीने देशभर चर्चेत राहिले. मोदींची अयोग्य वक्तव्ये हेही भाजपच्या पीछेहाटीचे एक कारण आहे, असे गेहलोत यांनी म्हटले. त्यामुळे राहुल यांचे समर्थन करतानाच मोदींना लक्ष्य करण्यासाठी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे.





