Ladakh protest : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लडाखमधील घडामोडींवरून भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीकास्त्र सोडले. लडाखची अद्भुत जनता, संस्कृती आणि परंपरा भाजप, संघाच्या निशाण्यावर असल्याचे त्यांनी म्हटले. लडाखमधील आंदोलनाला नुकतेच हिंसक वळण मिळाले. लेहमध्ये आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष झाला. त्यामध्ये ४ आंदोलक मृत्युमुखी पडले. त्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व करणारे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली. त्या घडामोडींवर राहुल यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया दिली. लडाखच्या जनतेने आपला आवाज उठवला. त्यावर प्रतिसाद म्हणून ४ तरूणांचा बळी घेण्यात आला. तसेच, वांगचुक यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. हत्या आणि हिंसाचार रोखला जावा. धाकदपटशा दाखवणेही बंद व्हावे. लडाखला स्वत:चा आवाज दिला जावा. तसेच, लडाखचा समावेश राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये करण्यात यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या लडाखमधील स्थितीच्या हाताळणीवरून कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्ष तेथील प्रशासन आणि मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. अशात राहुल यांनी भाजपला थेट लक्ष्य केले.