Chakan Road Accident : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने दुचाकीला उडवलं, सुरक्षारक्षकाचा मृत्यू
Chakan Road Accident : शिक्रापूर-चाकण रस्त्यावरील जातेगाव खुर्द येथे दुचाकी आणि टेम्पोचा भीषण अपघात; थिटेवाडी येथील ६४ वर्षीय बाळासाहेब निवृत्ती वाजे यांचा उपचारादरम्यान मृत्यू.
Updated On:

Chakan Road Accident – शिक्रापूर-चाकण रस्त्यावर जातेगाव खुर्द गावच्या हद्दीत हॉटेल सनीबारसमोर झालेल्या भीषण अपघातात एका कंपनीच्या सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब निवृत्ती वाजे (वय ६४, रा. थिटेवाडी केंदूर, ता. शिरूर) असे मृताचे नाव असून, या घटनेमुळे थिटेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
बाळासाहेब वाजे हे केंदूर येथील एस. एच. के. ऑटोकम्पेन्ट कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. गुरुवारी (दि. १६) ते आपल्या दुचाकीवरून शिक्रापूरकडून चाकणकडे चालले असताना, पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत वाजे हे गंभीर जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी दत्तात्रय वाजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलिसांनी टेम्पो चालक बाळू कोंडीबा ढोंबरे (रा. पुसद, जि. यवतमाळ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





