प्रभात वृत्तसेवा पिंपरी – नववर्षाचे स्वागत उत्साहात साजरे होत असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. अवैध मद्यविक्री, अमली पदार्थांची वाहतूक, रॅश ड्रायव्हिंग आणि विनापरवाना पार्ट्यांवर करडी नजर ठेवत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडकर सज्ज झाले असून, शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, नागरिकांच्या आनंदाला कोणत्याही अनुचित प्रकाराने गोलबोट लागू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस दल पूर्णपणे सज्ज झाले आहे. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, महत्त्वाच्या चौकांत नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी सुरू आहे.नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल्स, क्लब, रिसॉर्ट्स आणि फार्महाऊसेस येथे सेलिब्रेशनची मोठी तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी बुकिंग फुल झाल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान विनापरवाना पार्टी आयोजित करणे, अवैध मद्यविक्री करणे किंवा अमली पदार्थांचा वापर केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. कडक पोलीस बंदोबस्त व पथके तैनात शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, हॉटेल्स परिसर, महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांवर विशेष पथके नेमण्यात आली आहेत. महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र महिला गस्तपथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलीस दल, दंगल नियंत्रण पथके आणि गुन्हे शाखेची पथकेही सतर्क आहेत.वाहतूक शाखेमार्फत मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई करण्यात येणार आहे. विनापरवाना पार्टी टाळा ; पोलिसांचे आवाहन हॉटेल्स, कंपन्या, रिसॉर्ट्स चालकांनी सर्व आवश्यक परवानग्या घेऊनच कार्यक्रम आयोजित करावेत, अन्यथा गुन्हे नोंदवले जातील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच मद्यपान करणाऱ्यांनी परवाना घेणे बंधनकारक असल्याचीही सूचना देण्यात आली आहे. “कायदाभंग केल्यास थेट कारवाई” – मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांवर थेट कारवाई – सार्वजनिक ठिकाणी दंगामस्ती, गोंधळ, छेडछाड करणारांवर गुन्हे – अवैध मद्य तस्करी व अमली पदार्थांवर विशेष मोहीम – कुटुंबीयांसोबत शांततेत नववर्ष साजरे करण्याचे आवाहन