PCMC News: महासभेत राडा! मोशी दुर्घटनेवरून शिवसेना-भाजप आमनेसामने; आमदारांच्या उल्लेखावरून जोरदार खडाजंगी
PCMC News: मोशी कचरा डेपो आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी महासभेत प्रशासनाचे वाभाडे; पर्यावरण विभागातील भ्रष्टाचारावरून सर्वपक्षीय नगरसेवक संतप्त.

PCMC News – महापालिकेची जुलै महिन्याची सभा बुधवारी (दि. १५) आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे होते. ही सभा मोशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. त्यानंतर झालेल्या चर्चेत नगरसेवकांनी पर्यावरण विभागाच्या भ्रष्ट कारभारावर टीका केली. तर शिवसेनेच्या नगरसेवकांचा अप्रत्यक्षपणे रोख आमदार महेश लांडगे यांच्यावर असल्याने भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली.
भाजपच्या नगरसेवकांनी अनेकदा आक्षेप घेतल्याने सभागृहात मोठा गोंधळ झाला. मोशी दुर्घटनेला सर्वस्वी प्रशासन आणि पर्यावरण विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत. त्यांनी सर्व नियम पायदळी तुडवत मोशीमध्ये प्रकल्प उभे केला. त्याप्रकरणी मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी ती पुरेशी नाही.
अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना नारळ देऊन कायमच महापालिकेतून हाकललं पाहिजे असे म्हणत सर्वपक्षीय नगरसेवकांनी मोशी दुर्घटनेवरून महापालिका प्रशासनाचे वाभाडे काढले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी मोशीकरांच्या भावनेशी सहमत असून आपल्याला पर्यायी जागांचा शोध घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. याचवेळी बोलताना शिवसेनेच्या नगरसेविका सुलभा उबाळे आणि मोशीतील नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
सुलभा उबाळे म्हणाल्या, याप्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होणे आवश्यक होतं. इमारतीला परवनागी नव्हती. त्यावेळी आयुक्त शेखऱ सिंह आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या कार्यकाळात हे उद्योग झाले आहेत. त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा. आरोग्य आणि कचरा यावर महापालिकेने कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. यापूर्वी कचरा विलगीकरणासाठी दहा कोटी रुपयांचे डब्बे वाटले आहेत.
याची अमंलबजावणी करण्याचे काम प्रशासनाचे होते. मोठ्या लोकप्रतिनिधींनी डोक्यात आणल असत तर मोशीचा कचराडेपो यापूर्वीच बंद झाला असता, असे म्हणताच भोसरी विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही काळ सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर उबाळे यांनी आक्रमक होत भोसरीमध्ये शौचालय साफ करण्यासाठी देखील यांची परवानगी लागते असे म्हणत जोरदार टीका केली.
यावेळी त्यांनी नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे होता. या वाक्यावर देखील भाजपच्या नगरसेवकांनी उभे राहत जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण झाले होते.
तो राजकीय नेता कोण?
दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी संजय कुलकर्णी यांच्या कार्यालयात एका राजकीय व्यक्तीची माणसे कायम बसलेली असतात असा आरोप केला. त्याचवेळी सुलभा उबाळे यांनी देखील कुलकर्णी यांच्या कार्यालयाचे सीसीटीव्ही तपासा. सगळे बगलबच्चे तिथे बसलेले असतात असा आरोप केला. त्यामुळे तो राजकीय नेता कोण? ही चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.





