PCMC News : महापालिकेचा महासंकल्प! ‘माझी वसुंधरा ७.०’ अंतर्गत तब्बल ५ लाख झाडे लावणार
PCMC News : महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते 'माझी वसुंधरा' अभियानाचा शुभारंभ; शहर हिरवेगार आणि स्वच्छ करण्यासाठी नागरिकांना सहभागाचे आवाहन.

PCMC News – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पिंपरी चिंचवड शहराचे वैभव असलेल्या दुर्गादेवी टेकडी सारख्या विविध ठिकाणी पाच लाख झाडे लावून ती जगविण्याचा निर्धार शुक्रवारी (दि. ५) महापालिकेने केला आहे, यानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहर अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दुर्गाटेकडी येथे मान्यवरांच्या हस्ते १,००० रोपांची लागवड करून ‘हरित पिंपरी-चिंचवड शहर’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी महापौर रवि लांडगे बोलत होते. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त निगडी प्राधिकरण येथील ग.दि.माडगूळकर नाट्यगृह ते दुर्गादेवी टेकडी दरम्यान १० किलोमीटर अशी सायकल फेरी आयोजित करण्यात आलेली होती.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, दुर्गा टेकडी हे केवळ एक उद्यान नसून पिंपरी चिंचवड शहराचे अमूल्य नैसर्गिक रत्न आहे. ‘दुर्गा’ या नावातच सामर्थ्य आणि ऊर्जा दडलेली असून ही टेकडी नागरिकांना सकारात्मक ऊर्जा, प्रेरणा आणि निसर्गाशी जोडणारी महत्त्वाची जागा आहे. या टेकडीचे वैभव घडविण्यात अनेक घटकांचे योगदान आहे. तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक संतुलन राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.
दुर्गा टेकडीला देशपातळीवर एक प्रमुख प्रेक्षणीय स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे. त्याचबरोबर यावर्षी शहरातील वृक्षाच्छादन ३३ टक्क्यांपर्यंत वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. निगडी येथील ओसाड आणि खडकाळ टेकडीचे रूपांतर आजच्या नयनरम्य ‘दुर्गादेवी टेकडी उद्यानात’ करणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पहिल्या पिढीतील शिल्पकारांच्या योगदानाचाही यावेळी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्यात आला.
महापालिकेचे पहिले प्रशासक हरनामसिंग, माजी अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंढे आणि तत्कालीन मुख्य उद्यान अधीक्षक शांताराम भोंडवे यांच्या दूरदृष्टी आणि अथक परिश्रमांमुळेच हे विस्तीर्ण हरित वैभव उभे राहिले. त्यांनी केवळ प्रशासकीय जबाबदारी म्हणून नव्हे, तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या टेकडीवर लाखो वृक्षांचे जतन करून शहराला ऑक्सिजन हब मिळवून दिला. त्यांच्या याच ऐतिहासिक कार्याचा वारसा पुढे चालवत महापालिकेने आता ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे.






