PCMC News: पारदर्शक प्रशासन अन् आदर्श शहराचा ध्यास; ८० व्या स्वातंत्र्यदिनी महापालिकेचा राष्ट्रविकासाचा संकल्प
PCMC News: स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण; 'स्वागतम ई-प्रवेश' प्रणाली आणि 'सीएसआर' पोर्टलचे झाले उद्घाटन.

PCMC News – स्वातंत्र्य म्हणजे केवळ आपल्याला मिळालेला अधिकार नसून राष्ट्र आणि समाजाप्रती असलेली मोठी जबाबदारी देखील आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विकास करताना प्रत्येक नागरिकाला दर्जेदार मूलभूत सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सुलभ सेवा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे.
स्वातंत्र्याची मूल्ये जपत लोककल्याण, पर्यावरण संवर्धन, महिला सन्मान आणि सर्वसमावेशक विकासाचा ध्यास घेऊन पिंपरी-चिंचवडला देशातील आदर्श शहर बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते देशभक्तिमय वातावरणात ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या बलीदान, समर्पण व त्यागाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करताना महापौर लांडगे हे बोलत होते. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपस्थितांनी महिलांना समानतेने, आदराने आणि संवेदनशीलतेने वागणूक देण्याची शपथ घेतली तसेच महिलांसाठी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ निर्माण करण्या निर्धारही व्यक्त करण्यात आला. याशिवाय विकसित, सक्षम आणि नागरिकाभिमुख पिंपरी-चिंचवडच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही देण्यात आली.
शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पाण्याचा प्रत्येक थेंब जपणे, जलस्रोतांचे संवर्धन करणे आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा संदेश केवळ घोषणेपुरता मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प उपस्थितांनी सामुहिक शपथ घेऊन केला.
“स्वातंत्र्याच्या मूल्यांचे जतन करत विकासाची नवी दिशा, लोककल्याणाचा ध्यास, पर्यावरणाप्रती जबाबदारी आणि नागरिकाभिमुख प्रशासनाची बांधिलकी यांचा समन्वय साधत अधिक सक्षम, सुंदर, सुरक्षित आणि विकसित पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने योगदान देण्याचे आवाहन आजच्या स्वातंत्र्यदिनी करण्यात आले.”
– रवि लांडगे, महापौर.





