Pay and Park: पिंपरी-चिंचवडकरांच्या खिशाला पुन्हा कात्री? ‘पे अँड पार्क’वरून सोसायट्या आक्रमक
Pay and Park: 'पे अँड पार्क' धोरणाविरोधात चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचा तीव्र आक्षेप; पार्किंग सुविधा मोफत देण्याची मागणी.

Pay and Park – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात पुन्हा एकदा ‘पे अँड पार्क’ धोरण राबविण्याच्या हालचाली सुरू केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांना अद्याप पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. त्यातच पार्किंगच्या नावाखाली नागरिकांकडून शुल्क आकारण्याचा प्रयत्न म्हणजे नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्याचा प्रकार असल्याचा आरोप चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनने केला आहे.
चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे. ‘रस्त्यात खड्डे नाहीत, तर खड्ड्यातच रस्ते आहेत’, अशी परिस्थिती आहे. रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची होत असतानाही संबंधित ठेकेदारांवर ठोस कारवाई होत नाही.
पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, कचरा व्यवस्थापन, पार्किंग यांसह नागरिकांना आवश्यक असलेल्या विविध मूलभूत सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारी कायम आहेत. स्वतःच्या शहरात वाहन पार्क करण्यासाठीही नागरिकांनी पैसे का द्यायचे? शहरातील उपलब्ध पार्किंग सुविधा शक्य तितक्या मोफत उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली.
पालिकेच्या तिजोरीत नागरिकांकडून विविध प्रकारचे कर आणि शुल्क जमा होत असताना त्याबदल्यात नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. मूलभूत सुविधांचा प्रश्न कायम असताना त्यावर तोडगा न काढता ‘पे अँड पार्क’च्या माध्यमातून पुन्हा नागरिकांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका फेडरेशनने घेतली आहे. “नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था शक्यतो मोफतच असली पाहिजे.
पालिकेने पे अँड पार्क धोरण राबविण्यापूर्वी शहरातील रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत प्रश्न सोडवावेत. नागरिकांना सुविधा न देता केवळ विविध शुल्कांच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा प्रकार फेडरेशन कदापि सहन करणार नाही. या धोरणाला आमचा तीव्र विरोध असून नागरिकांच्या हितासाठी फेडरेशन ठामपणे भूमिका मांडणार आहे,” असे सांगळे यांनी स्पष्ट केले.






