PCMC News: नाशिक फाटा पुलाची होणार दुरुस्ती! स्थायी समितीत ‘या’ ५ मोठ्या निर्णयांवर शिक्कामोर्तब
PCMC News: नाशिक फाटा उड्डाणपूल आणि वाकड रस्त्याच्या दुरुस्तीला स्थायी समितीची मंजुरी; औंध-रावेत BRTS रस्त्याचे मानांकन वाढवणार.

PCMC News – शहरातील महत्त्वाच्या रस्ते आणि बीआरटीएस मार्गांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भात स्थायी समितीच्या बैठकीत विविध कामांना मान्यता देण्यात आली. नाशिक फाटा उड्डाणपुलाची स्थापत्यविषयक दुरुस्ती, तसेच कॉरिडॉर क्रमांक ३ नाशिक फाटा ते वाकड रस्त्याची देखभाल दुरुस्ती व इतर अनुषंगिक स्थापत्य कामे करण्यात येणार आहेत.
त्याचबरोबर औंध-रावेत बीआरटीएस रस्त्याचे मूल्यमापन करून बसथांबे आणि बीआरटी मार्गाच्या स्थापत्य सुविधांचे मानांकन वाढविण्यासाठी आवश्यक कामांनाही मंजुरी देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिकेची स्थायी समितीची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती अभिषेक बारणे होते. महापालिकेच्या विद्यमान आठ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून दहा क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली असून,
नव्याने कार्यान्वित झालेल्या ‘लोहगड’ ल क्षेत्रीय कार्यालयासाठी आवश्यक फर्निचर व स्थापत्यविषयक कामांना मान्यता देण्यात आली. या कार्यालयामध्ये प्रभाग समिती सभागृह, प्रभाग अध्यक्ष केबिन, क्षेत्रीय अधिकारी व लेखा विभागासाठी आवश्यक कक्ष, कॅश काउंटर, तसेच स्थापत्य व विद्युत विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसाठी कार्यालयीन व्यवस्था विकसित करण्यात येणार आहे.
यामुळे नव्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र व नागरिकाभिमुख पद्धतीने करता येणार आहे. महापालिका रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी आवश्यक विविध प्रकारचे साहित्य खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली.
यामुळे योजनेंतर्गत पात्र रुग्णांना आवश्यक शस्त्रक्रिया साहित्य वेळेत उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. कान, नाक व घसा विभागात वापरण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपकरणाचा हमी कालावधी पूर्ण झाल्याने पुढील एक वर्षासाठी त्याच्या सर्वसमावेशक देखभाल-दुरुस्तीला मान्यता देण्यात आली. त्यामुळे संबंधित अत्यावश्यक वैद्यकीय उपकरण कार्यक्षम स्थितीत ठेवता येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज पुतळा कामांनाही मान्यता
मोशी-बोऱ्हाडेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा परिसरासाठी उच्चदाब विद्युतपुरवठा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. या प्रकल्पात फसाड लाईटिंग, सीसीटीव्ही, अग्निशमन यंत्रणा, पुतळ्याभोवती आकर्षक एलईडी प्रकाश व्यवस्था आणि इतर विद्युतविषयक सुविधा प्रस्तावित असून त्यासाठी आवश्यक वीजजोडणीची कार्यवाही करण्यात येणार आहे.
“शहरातील नागरिकांना नियमित आणि सक्षम पाणीपुरवठा मिळणे, रस्ते व बीआरटीएससारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सुस्थितीत राहणे आणि महापालिकेच्या आरोग्य सेवांमध्ये आवश्यक उपकरणे व उपचार साहित्य वेळेत उपलब्ध होणे याला आम्ही प्राधान्य देत आहोत.”
– अभिषेक बारणे, सभापती , स्थायी समिती






