LPG Cylinder: १ ऑक्टोबरपासून सिलिंडर बंद? पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील ४ लाख ग्राहकांना मोठा धक्का
LPG Cylinder: अत्यावश्यक वस्तू कायदा व एलपीजी नियंत्रण आदेशानुसार कारवाई; एमएनजीएलची ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत.

LPG Cylinder – शहरातील सोसायट्यांमध्ये पाइप नॅचरल गॅस (पीएनजी) चे जाळे उपलब्ध असतानाही घरगुती एलपीजी सिलिंडर वापरणाऱ्या पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील चार लाख सदनिकाधारकांना पीएनजी जोडणी करून घ्यावी लागणार आहे; अन्यथा १ ऑक्टोबरपासून या ग्राहकांचा एलपीजी सिलिंडर पुरवठा थांबू शकतो. त्यामुळे ३० सप्टेंबरपूर्वी पीएनजी जोडणीसाठी अर्ज करून ती कार्यान्वित करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
आखाती युद्धानंतर केंद्र सरकारने नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादन वितरणाचे आदेश, तसेच अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत एलपीजी नियंत्रण आदेश अधिसूचित केले होते. त्यानुसार पीएनजी सुविधा उपलब्ध असूनही ती न घेणाऱ्या घरांचा एलपीजी पुरवठा रोखण्याची तरतूद आहे. सरकारने यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत दिली आहे.
दरम्यान, याबाबत अधिक माहिती देताना एमएनजीएलचे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर, वाणिज्यिक संचालक मेजर शंकर करजगी आणि संचालक बागेश्री मंठाळकर यांनी सांगितले, की पुणे परिसरात ९ लाख सदनिकाधारकांपर्यंत पीएनजी जाळे विस्तारले असून, ५ लाख सदनिकाधारकांचा वापर सुरू आहे.
सुमारे साडेसहा हजार सोसायट्यांमध्ये गॅस वाहिन्या पोहोचल्या आहेत. मात्र, अद्याप ४ लाख सदनिकांनी जोडणी घेतलेली नाही. यातील काही घरे बंद, तर काही भाडेतत्त्वावर आहेत. पुणे, पिंपरी- चिंचवडसह तळेगाव, चाकण आणि हिंजवडी परिसरातील या चार लाख ग्राहकांनी १ ऑक्टोबरपूर्वी अर्ज करून पीएनजी जोडणी कार्यान्वित करून घ्यावी, असे आवाहन एमएनजीएलने केले आहे.
३७१ सोसायट्या एलपीजीमुक्त
पुणे परिसरातील सोसायट्यांना पीएनजी वापरास प्रोत्साहन देऊन त्या एलपीजी सिलिंडरमुक्त करण्यावर एमएनजीएलने भर दिला आहे. या मोहिमेला यश मिळत असून, मागील पाच महिन्यांत ३७१ सोसायट्या एलपीजीमुक्त करण्यात आल्या आहेत. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात आणखी आठशे सोसायट्या एलपीजी सिलिंडरमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी सोसायट्यांमध्ये जागृती केली जात आहे, असे व्यवस्थापकीय संचालक गिरीजा शंकर यांनी सांगितले.






