PCMC News: महापालिकेच्या शाळा खासगी संस्थांच्या घशात? पिंपरी-चिंचवडमध्ये युवक काँग्रेस आक्रमक
PCMC News: पारदर्शकतेचा अभाव असल्याचा संशय; निर्णय मागे न घेतल्यास व्यापक लोकआंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्याचा इशारा.

PCMC News – महाराष्ट्र प्रदेश व पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवी लांडगे तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांची भेट घेऊन पालिकेच्या शाळा आणि शैक्षणिक आरक्षण असलेल्या जमिनी खासगी संस्थांच्या ताब्यात देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे उमेश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सहा शाळा “आकांक्षा फाउंडेशन” या खाजगी संस्थेकडे चालविण्यास देण्याची प्रक्रिया तसेच पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक ३८ व ४४ मधील शाळेसाठी आरक्षित असलेली जमीन या खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय हा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारा असल्याचे युवक काँग्रेसने नमूद केले. पालिकेच्या शाळांमध्ये प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगार, कष्टकरी व वंचित घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेतात.
अशा शाळांचे व्यवस्थापन खासगी संस्थांकडे सोपवून निवडक विद्यार्थ्यांसाठी वेगळी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न हा विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण करणारा असून समान शिक्षणाच्या घटनात्मक तत्त्वांनाच बाधा पोहोचवणारा आहे. संबंधित निविदा प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याची शंका व्यक्त करत युवक काँग्रेसने संपूर्ण प्रक्रिया तात्काळ स्थगित करून तिची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली.
शैक्षणिक आरक्षण असलेल्या जमिनी कोणत्याही खासगी संस्थेला देण्याचा निर्णय रद्द करण्यात यावा, तसेच पालिकेच्या शाळांचे व्यवस्थापन खासगी संस्थांकडे सोपविण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली. अन्यथा युवक काँग्रेसच्या वतीने व्यापक लोकआंदोलन, आमरण उपोषणासह तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उमेश खंदारे यांच्यासह पिंपरी चिंचवड शहर एन एस यु आयचे अध्यक्ष सौरभ शिंदे, शहर युवक काँग्रेसचे करण गिल, सयान अन्सारी आदी उपस्थित होते.





