PCMC News: महापालिकेचे १५० कोटींचे नुकसान; ‘फुकट्या’ जाहिरातदारांना स्थायी समितीचे अभय?
PCMC News: शहरातील १ लाखांहून अधिक विद्युत खांबांवर विनापरवाना जाहिरातींचा सुळसुळाट; पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची निविदा प्रक्रिया स्थायी समितीच्या दारात अडकली.

PCMC News – शहरात ठिकठिकाणी फुकट्या जाहिरातदारांकडून जाहिरातबाजी करुन शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. फुकट्या जाहिरातदारांवर आळा घालण्यासाठी आणि जाहिरातीतून उत्पन्न मिळविण्यासाठी महापालिकेच्या आकशचिन्ह व परवाना विभागाने जाहिरात धोरण निश्चित केले आहे. त्यासाठी किऑक्स, रस्त्यांवरील गॅण्ट्री (दिशादर्शक लोखंडी कमान) तसेच, उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात जाहिराती लावण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे.
मात्र, त्याबाबतचा प्रस्ताव गेल्या तीन महिन्यांपासून स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवला असून देखील त्याला मान्यता दिली जात नाही. त्यामुळे या फुकट्या जाहिरातदारांना स्थायी समिती अभय देत आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात महापालिकेचे तब्बल १ लाख १४ हजार ४६२ विद्युत दिव्यांचे खांब आहेत. त्यातील अनेक खांबांवर किऑक्स लावून बिनभोबाट जाहिराती केल्या जात आहेत. त्याला महापालिका प्रशासनाकडून कसलाही लगाम नाही.
शेकडो खांबांवर किऑक्स लावून बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, क्लासेस आपली फुकटची जाहिरात करून घेतात. अशा प्रकारे किऑक्स लावण्यासाठी ठराविक जाहिरात एजन्सी शहरात कार्यरत आहेत. त्यातून महापालिकेस कोणतेही शुल्क मिळत नाही. ते सर्व उत्पन्न खासगी एजन्सीच्या खिशात जात आहे. किऑक्स लावल्यानंतर अनेक दिवसांनंतर संबंधित क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. मात्र, तोपर्यंत त्याच्या जाहिरातीचा हेतू साध्य झालेला असतो.
याच प्रकारे शहरातील मुख्य रस्त्यांवरील गॅण्ट्रीवर फुकटची जाहिरात केली जात आहे. त्यावर विशेष करून राजकीय पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्याच्या जाहिरातीचे प्रमाण अधिक असते. वाढदिवस, सण, उत्सव, स्पर्धा, महापुरुषांच्या जयंतीनिमित्तचे फ्लेक्स लावले जातात. मात्र, त्या जाहिरातीतूनही महापालिकेस काहीच उत्पन्न मिळत नाही. शहरातील १८ मीटर व त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यांवर एकूण ९७ गॅन्ट्री आहेत. शहरात महापालिकेचे असंख्य उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग आहेत.
तेथे जाहिरात लावण्याबाबत महापालिकेचे अद्याप कोणतेही धोरण नाही. त्यामुळे तेथे शेकडो जाहिराती लावल्या जातात. जाहिरात एजन्सी, नेतेमंडळी, सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी फुकटच्या जाहिराती लावत आहेत. त्या माध्यमातूनही महापालिकेच्या तिजोरीत काहीच भर पडत नाही. या सर्व प्रकारामुळे महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाचे दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. मात्र, खासगी जाहिराती एजन्सी, बांधकाम व्यावसायिक, शैक्षणिक संख्या, राजकीय नेतेमंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते फुकटची जाहिरातबाजी करत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, त्याचे स्थायी समितीला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
दीडशे कोटींचे उत्पन्न मिळणार
विद्युत खांबांवर किऑक्स लावणे. रस्त्यावरील गॅन्ट्रीवर जाहिराती लावणे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात जाहिरात लावणे यासाठी महापालिकेकडून निविदाप्रक्रिया राबविण्यात आली असून वर्षाला सुमारे १५० कोटीचे उत्पन्न मिळणार आहे. निविदा प्रक्रिया राबवून स्थायी सभेकडे मंजुरीसाठी ठेवली आहे. मात्र, स्थायीकडून त्याला मान्यता देण्यात येत नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.
“विद्युत खांबांवर किऑक्स लावणे. रस्त्यावरील गॅण्ट्रीवर जाहिराती लावणे. उड्डाणपूल आणि भुयारी मार्गात जाहिरात लावणे यासाठी आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून क्षेत्रीय कार्यालयानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्याला जाहिरात एजन्सींचा प्रतिसाद मिळाला आहे. स्थायी समितीची मान्यता मिळाल्यानंतर त्यासंदर्भातील प्रत्यक्ष कामकाज सुरू होईल. त्यातून महापालिकेस दरवर्षी भरघोस उत्पन्न मिळणार आहे. तसेच, शहरभरात विनापरवाना लावण्यात येणार्या जाहिराती, फ्लेक्स, किऑक्सवर नियमितपणे कारवाई केली जात आहे.”
– राजेश आगळे, उपायुक्त, आकाशचिन्ह व परवाना विभाग.






