PCMC News : महापालिकेची मोठी कारवाई! ४ आरसीसी इमारतींवर लावले नोटीस बोर्ड; बिल्डरांचे धाबे दणाणले
PCMC News : शहराच्या सुरक्षित नागरी विकासासाठी महापालिका कठोर; नियमभंग करणाऱ्या बांधकामांना भविष्यातही कोणतीही सवलत नाही.

PCMC News – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात निगडी येथील रुपीनगर मेन रोड, तळवडे येथील गजानन हौसिंग सोसायटी परिसरात सुरू असलेल्या चार आर.सी.सी. स्वरूपातील अनधिकृत बांधकामांवर बांधकाम अनधिकृत असल्याबाबतचे नोटीस बोर्ड लावण्यात आले असल्याची माहिती फ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांनी दिली आहे.
ही बांधकामे महापालिकेच्या बांधकाम नियमावली व विकास नियंत्रण नियमांचे उल्लंघन करून रेडझोनमध्ये उभारली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित बांधकाम धारकांना नोटीस बजावण्यात आली असून या बांधकामांवर लवकरच निष्कासनाची कार्यवाही प्रस्तावित असून, नियमानुसार आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून संबंधित बांधकामे निष्कासित करण्यात येणार आहेत.
महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही स्थावर मालमत्ता, फ्लॅट किंवा घर खरेदी करण्यापूर्वी संबंधित बांधकामास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी, बांधकाम परवानगी व इतर आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे पडताळणी करावी. अनधिकृत बांधकामांमध्ये गुंतवणूक केल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी.
अनधिकृत बांधकामांवर भविष्यातही नियमानुसार सातत्याने कारवाई करण्यात येणार असून शहरातील नियोजित व सुरक्षित नागरी विकासासाठी नियमभंग करणाऱ्या बांधकामांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
“अनधिकृत बांधकामांबाबत महापालिकेने कठोर भूमिका घेतली असून शहरातील कोणतेही बांधकाम विकास नियंत्रण नियम व सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीशिवाय उभारले जाणे स्वीकारार्ह नाही. असे बांधकाम नागरिकांच्या सुरक्षिततेसह कायदेशीर अधिकारांनाही बाधक ठरते. त्यामुळे अशा सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार नोटीस बजावण्यात आली असून आवश्यक ती निष्कासन कारवाई टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. नागरिकांनीही मालमत्ता खरेदीपूर्वी सर्व परवानग्या व कागदपत्रांची काटेकोर पडताळणी करूनच व्यवहार करावा, जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचे आर्थिक किंवा कायदेशीर नुकसान टाळता येईल.”
– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका






