Dehuroad News : देहूरोड-निगडी मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा; २ भुयारी मार्गांच्या कामाला लष्कराची मंजुरी
Dehuroad News : काळोखे मळा ते हगवणे वस्ती रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणार; किवळे परिसरातील महावितरणच्या वीजवाहिनीचा प्रश्नही मार्गी लागणार.

Dehuroad News – देहूरोड-निगडी रस्त्यावरील केंद्रीय विद्यालय आणि देहूरोड ऑर्डनन्स फॅक्टरी दरम्यान मंजूर झालेल्या दोन भुयारी मार्गांच्या (अंडरपास) कामाला सदर्न कमांड ब्रिगेडियर आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने मान्यता दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
देहूरोड येथील सदर्न कमांड कार्यालयात शनिवारी (दि. ६) विविध विकासकामांबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सदर्न कमांड ब्रिगेडियर आशिष कटोज, कर्नल अमित श्रीवास्तव, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत यादव, एमएसआरडीसीचे उपअभियंता विकास पिंपळकर, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य कैलास पानसरे, शिवसेना देहूगाव शहर प्रमुख सुनिल हगवणे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष राजेंद्र तरस, ऑर्डनन्स फॅक्टरी देहूरोड एम्प्लॉय युनियन अध्यक्ष मोहन घुले उपस्थित होते.
खासदार बारणे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून एमएसआरडीसीकडून या दोन भुयारी मार्गांना मान्यता मिळाली आहे. आता सदर्न कमांड आणि कॅन्टोन्मेंट बोर्डानेही तत्त्वतः मंजुरी दिल्याने काम लवकर सुरू होण्याची अपेक्षा आहे. बैठकीत काळोखे मळा ते हगवणे वस्ती दरम्यानच्या रस्त्याच्या दुरवस्थेचाही आढावा घेण्यात आला. संरक्षण विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, पुढील महिन्यात पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीबाबतही चर्चा झाली. संरक्षण विभागाच्या जागेतून जाणाऱ्या या मार्गाच्या दुरुस्तीला ब्रिगेडियर यांनी मान्यता दिली असून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम करण्यात येणार आहे. किवळे परिसरातील महावितरणची वीजवाहिनी संरक्षण विभागाच्या हद्दीतून जात असल्याने त्या संदर्भातील विषयावरही बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती खासदार बारणे यांनी दिली.




