PCMC News: अजितदादांच्या जयंती कार्यक्रमावरून खडाजंगी; वेळेवरून राष्ट्रवादी अन् भाजप आमनेसामने
PCMC News: पिंपरी चिंचवड पालिकेत जनसंपर्क विभागाच्या हलगर्जीपणामुळे गदारोळ; वेळेत अभिवादन न केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा तीव्र संताप.

PCMC News – आपल्या कामासाठी वेळ पाळणाऱ्या दिवंगत अजितदादा पवार यांची जंयतीचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड महापालिकेत वेळेत घेण्यात आला नाही. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच तापले. दुपारी बारा वाजून गेले तरी अजितदादांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून आदारांजली वाहिली नाही. यावरून सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका वैशाली घोडेकर यांच्यात वाद झाला.
बुधवारी (दि. २२) दिवंगत अजितदादा पवार यांची पहिली जयंती होती. महापालिकेत जनसंपर्क विभागाच्या वतीने प्रत्येक जयंती आणि पुण्यतिथीचा कार्यक्रम घेण्यात येतो. मात्र, अजित पवार यांच्या जयंतीदिनी दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली नाही. यामुळे आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका यांनी थेट सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांना महापालिकेच्या तळमजल्यावर प्रश्न विचारला.
त्यावेळी दोघांमघध्ये बाचाबाची झाली. यावेळी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. आजचा दिवस आमच्यासाठी भावनिक होता. आज तरी दादांच्या प्रतिमेला वेळेत पुष्पहार अर्पण करायला पाहिजे होता अशी भूमिका घोडेकर यांनी मांडली. मुख्यमंत्री यांची भेट तुमच्यासाठी महत्वाची होती. मात्र, अजितदादांचा हा दिवस आमच्यासाठी देखील महत्वाचा होता असेही घोडेकर यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी सुनावले.
महापौर, विरोधी पक्षनेत्यांची गैरहजेरी
अभिवादनाच्या कार्यक्रमाला महापौर रवि लांडगे आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर गैरहजर होते. शहराचे प्रथम नागरिकच अभिवादनाच्या कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.





