PCMC News : आयुक्त हर्डीकरांना पाळीव श्वानाचा चावा? महापालिकेत चर्चांना उधाण, पण वैद्यकीय विभाग गप्प; नक्की काय झालं?
PCMC News : सभेत नगरसेवकाने 'टेडी श्वान' भेट देऊन प्रशासनाचा निषेध केला आणि त्यानंतरच ही घटना समोर आल्याने चर्चांना उधाण.

PCMC News – पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पाळीव श्वानाने चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट आयुक्तांनाच श्वानाने चावा घेतल्यामुळे महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे या बाबीवर वैद्यकीय विभागातील अधिकाऱ्यांनी तोंडावर बोट ठेवले. आम्हाला याबाबाबत काहीही माहिती नसल्याचे वायसीएम व महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न गंभीर झाला आहे. मागील वर्षभरात तब्बल २८ हजार नागरिकांना चावा घेतल्याची नुकतीच आकडेवारी समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेत शुक्रवारी (२० रोजी) झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेतही श्वानांच्या प्रश्नांवरून सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले होते.
सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाने श्वानांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी आयुक्त हर्डीकर यांना श्वानांचा टेडी भेट दिला होता. त्यावरून शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्न गंभीर असून प्रशासन या भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यात कमी पडत असल्याची टीका नगरसेवकांनी केली होती. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनाच कुत्र्यांने चावा घेतल्याने महापालिकेत जोरदार चर्चा झाली.





