PCMC News : पिंपरी-चिंचवडच्या फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त श्रावण हर्डीकरांनी दिला ‘हा’ शब्द
PCMC News : ८ प्रभागांमध्ये जागा निश्चितीचे आव्हान; प्रशासकीय दिरंगाई संपवून समितीची बैठक तातडीने घेण्याचे आयुक्तांचे आश्वासन.

PCMC News – पिंपरी चिंचवड शहरातील पथारी, हातगाडी, स्टॉल धारकांचे नियोजन करावे, यासाठी महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ व समिती सदस्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी लवकरच फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करू असे आश्वासन पथविक्रेता समिती सदस्य व महासंघाचे पदाधिकारी यांना दिले.
महानगरपालिकेकडून आचारसंहिता कालावधीमध्ये हे काम थांबलेले होते. कामगार नेते काशिनाथ नखाते म्हणाले की, २०२२ मध्ये फेरीवाल्यांचे सर्वेक्षण झालेले असून त्यांना फेरीवाला प्रमाणपत्र दिले जात नाही ते त्वरित देण्यात यावे. तसेच समितीची बैठक घेऊन कामकाज सुरू करावे, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण आदेशाचे पालन करण्यात यावे.
अ ब क ड ई फ ग ह या आठही प्रभागांमध्ये अधिकाऱ्यांना आदेश करून जागा निश्चिती करणे गरजेचे आहे असे मत नखाते यांनी व्यक्त केले. विविध मागण्यांचे निवेदन देऊन आयुक्तांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर आयुक्त म्हणाले आवश्यक ती कार्यवाही सुरू केलेली असून लवकरच आपण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी समितीची बैठक घेऊन योग्य नियोजन करू.
यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, पिंपरी चिंचवड महानगरपालिका समिती सदस्य राजू बिराजदार, सदस्य किरण साडेकर, सदस्य अलकाताई रोकडे, सदस्य किसन भोसले,महासंघाचे राजेश माने, इरफान चौधरी, बालाजी लोखंडे, उपस्थित होते.




