PCMC News: उपसूचनेचा आणखी एक घोटाळा? तीन शहर अभियंता पदावरून सत्ताधारी बॅकफूटवर…नेमकं प्रकरण काय?
PCMC News: मुख्य अभियंता पद रद्द करून ३ शहर अभियंता पदे निर्माण करण्याचा विषय; पत्रकारांनी पुराव्यासह दाखवल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांची कोंडी.

PCMC News – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मुख्य अभियंतापद रद्द करून तीन शहर अभियंता पदे करण्यात आली. त्यात दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती देत एका मर्जीतील अधिकाऱ्यासाठी एक पद रिक्त ठेवले. मात्र, आता सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच उपसूचनेवर घूमजाव करत उपसूचना दिलीच नसल्याचा दावा केला आहे.
त्यामुळे ६० कोटींच्या उपसूचनेच्या घोटाळ्यानंतर पुन्हा बोगस उपसूचना देण्यात आली का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंतापद रद्द करून त्याऐवजी शहर अभियंत्याची तीन पदे निर्माण करण्यास सत्ताधारी भाजपने सोमवारी (दि.२७) सर्वसाधारण सभेत मान्यता दिली. या प्रस्तावामुळे सत्ताधाऱ्यांचा वाटेल तसा कारभार समोर आला होता.
मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी वाट्टेल तसा निर्णय सभेत घेण्याचा हा प्रकार मानला जात आहे. मात्र, आता त्यानंतर बुधवारी (दि. २९) आयोजित पत्रकार परिषदेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी अशी कोणतीही उपसूचना दिलीच नसल्याचा दावा करत खोटेपणाचा कळस गाठला. सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे, महापौर रवि लांडगे आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी अशी उपसूचना दिलीच नसल्याचे रेटून सांगितले.
तर शहर अभियंता पद एकच असून तीन शहर अभियंता पदे केल्याच्या बातम्या खोट्या छापल्या असल्याचे खापर देखील पक्षनेते शितोळे यांनी प्रसिद्धी मध्यमांवर फोडले. ते म्हणाले, आमच्या आधी आमच्या काही गोष्टी पत्रकारांना कशा माहित होतात कळत नाही. सुरक्षा रक्षकांचा विषय होता तो मंजूर करण्यात आला आहे. आम्ही कोणत्याही तीन शहर अभियंता पदांना मान्यता दिली नाही.
तशी उपसूचना देखील आम्ही मांडली नाही. त्यामुळे शहर अभियंता पदाबाबत ज्या काही बातम्या आल्या आहेत त्या काही खऱ्या नाहीत. त्यानंतर नगरसचिव कार्यालयाच्या दफ्तरात असलेली उपसूचना पत्रकारांनी वाचून दाखवल्यानंतर भाजपचे पदाधिकारी खोट बोलत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर कोंडीत सापडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ही उपसूचना दिलीच नसल्याचा कांगावा करायला सुरूवात केली.
सत्तारुढ पक्षनेते, महापौर आणि भाजपच्या शहराध्यक्षांना सर्वसाधारण सभेत दिलेल्या उपसूचनेबद्दल माहित नसल्याने पुन्हा एकदा बोगस उपसूचनांचा घोटाळा झाला आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे. सर्वसाधारण सभेत दिलेल्या उपसूचनेवर भाजपाच्या दोन नगरसेवकांच्या सह्या आहेत. त्या सह्या नगरसेवक विनोद नढे आणि सुरेश भोईर यांच्या असल्याची माहिती नगरसचिव कार्यालयातून मिळाली.
भाजपच्याच नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या असतानाही पदाधिकारी उपसूचना दिलीच नसल्याचा आव आणत आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून त्यातून महापालिकेचे अत्यंत महत्वाचे असलेल्या शहर अभियंता पदाचा देखील त्यांनी खेळ मांडला असल्याची टीका होत आहे.
“मी अजून उपसूचना मंजूर केली नाही. शहर अभियंता पदाचे नेमके प्रकरण काय आहे त्याची माहिती घेतो. सर्व कायदेशीर बाबी तपासून घेतो. त्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल.”
– रवि लांडगे, महापौर.






