PCMC News: महापालिकेचे कामकाज ठप्प! कोट्यवधींचा खर्च करूनही ‘डीएमएस’ यंत्रणेचा बोजवारा…’त्या’ कंपनीवर होणार कारवाई
PCMC News: जुलैच्या मुसळधार पावसामुळे डेटा सेंटरचा वीजपुरवठा खंडित; युपीएस आणि जनरेटर बॅकअप संपल्याने १० दिवस ऑनलाईन सेवा कोलमडली.

PCMC News – महापालिकेची ई ऑफिस प्रणाली अर्थात डीएमएस यंत्रणा वारंवार ठप्प होत असल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजावर आणि नागरिक सुविधांवर गंभीर परिणाम होत आहे. दहा दिवस ही प्रणाली बंद असल्यामुळे ऑनलाइन कामकाज ठप्प झाले होते. त्यात दुरुस्ती करून हे काम सुरु झाल्यानंतर आता संबधित ठेकेदार कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे, अशी माहिती स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
महापालिकेत ई-टपाल, डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टमद्वारे कागदपत्रांचे व्यवस्थापन करणारी प्रणाली (डीएमएस) विकसित करण्यात आली आहे. या यंत्रणेवर कोट्यवधींचा खर्च झालेला आहे. मात्र, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव ही यंत्रणा वारंवार ठप्प होते. त्याचा परिणाम महापालकिेच्या कामकाजावर होतो. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर पुन्हा ही प्रणाली बंद झाली होती. तब्बल दहा दिवस ती बंद असल्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, हे काम स्मार्ट सिटी कंपनीमार्फत झालेले आहे. संबधित कंपनीकडून त्यांनी सुरुवातीला दुरुस्तीचे काम करून घेतले. यंत्रणा पुर्ववत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. डीएमएस यंत्रणा गुरुवारी कार्यन्वित झाली आहे. तसेच, या संपूर्ण प्रकारानंतर संबधित कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यानंतर कंपनीविरुध्द योग्य कारवाई केली जाईल, असे स्पष्टीकरण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी दिले.
दरम्यान, शहरात ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे यंत्रणेत बिघाड झाला. त्यानंतर डेटा सेंटर सर्वप्रथम युपीएस व त्यानंतर जनरेटर बॅकअपवर चालविण्यात आले. मुख्य वीजपुरवठा दीर्घकाळ उपलब्ध न झाल्यामुळे, उपलब्ध बॅकअप साधनसामग्रीचा वापर संपुष्टात येत असल्याने नियंत्रित स्वरूपात शटडाऊन करण्याची आवश्यकता निर्माण झाली. तेव्हापासून यंत्रणा बंद पडल्याचे स्मार्ट सिटी कंपनीकडून सांगण्यात आले.
“मुसळधार पावसानंतर डीएमएस यंत्रणा बंद पडल्यामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळित झाले होते. त्यात दुरुस्ती करून पूर्ववत करण्यात आले आहे. या प्रकरणी हे काम करणाऱ्या कंपनीला नोटीस बजावण्यात येणार आहे.”
– किरणराज यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी




