PCMC : महापालिका तयार करणार शहराचा डीपीआर ; उद्यान, दुभाजकांतील झाडांसाठी एसटीपीच्या पाण्याचा वापर

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेचे सार्वजनिक उद्यान व दुभाजकांत झाडे व रोपे लावण्यात आली आहेत. त्या झाडांना नियमितपणे पाणी घालण्यासाठी मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरले जाणार आहे. महापालिकेकडून त्याचा डीपीआर तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी तज्ज्ञ सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे.महापालिकेचे शहरात अनेक मैलासांडपाणी शुद्धीकरण केंद्र आहेत. तेथून जवळ असलेल्या सार्वजनिक उद्यान व रस्त्यांवरील दुभाजकांपर्यंत स्वतंत्र जलवाहिनी टाकून एसटीपीचे पाणी दिले जाणार आहे.
त्यामुळे एसटीपीच्या पाण्याचा पुर्नवापर होणार आहे. त्यासाठी शहरभरात नव्याने स्वतंत्र जलवाहिनी टाकली जाणार आहे. त्या कामासाठी सर्व्हेक्षण करणे, अंदाजपत्रक तयार करणे, डिजाईन व आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी उद्यान व क्रीडा स्थापत्य विभागाने तज्ज्ञ सल्लागारांकडून दर मागविले होते. त्यात नागपूर येथील डीआरए कन्स्टंटस लिमिटेड या एजन्सीचा लघुत्तम दर स्वीकृत करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या किमतीच्या १.८७ टक्के शुल्क त्या एजन्सीला दिले जाणार आहे.
एकाच ठेकेदाराला पायघड्या..
पिंपरी-चिंचवड शहरातील पाणी व्यवस्थापन वाहिनीसाठी महापालिकेने सर्वेक्षण केले होते. त्यासाठी डीआरए कन्स्टंटस एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. असे असतानाही पाणीपुरवठा विभागाचे अनेक कामे मुदतीमध्ये पूर्ण झालेले नाहीत. त्यानंतर संपूर्ण शहरातील शहरातील ड्रेनेजलाईन तसेच, नैसर्गिक नाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याच एजन्सीकडून ड्रेनेज विभागाने हे सर्वेक्षण करून घेतले. आता, उद्यान विभागासाठी तीच एजन्सी सर्वेक्षण करणार आहे. त्यावरून एकाच एजन्सीवर महापालिका प्रशासन मेहरबान असल्याचे स्पष्ट होत आहे.





