PCMC: महापौरसाहेब, शरदनगरच्या रस्त्यांची पाहणी कराच; दोन वर्षांपासून रस्ते खोदलेलेच
PCMC: पावसाळ्यात चिखल, आता धुळीचे साम्राज्य!

चिखली : शहरात प्रशस्त रस्ते, आकर्षक सुशोभीकरण आणि विकासकामांचे ब्रँडिंग करण्यावर भर दिला जात असताना, दुसरीकडे प्रभाग क्रमांक ११ मधील शरदनगर परिसरातील सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गॅस पाइपलाइनच्या कामासाठी मागील दोन वर्षांपासून खोदलेले रस्ते अद्याप व्यवस्थित दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.
पावसाळ्यात चिखल आणि खड्ड्यांचा त्रास सहन केलेल्या नागरिकांच्या वाट्याला आता धुळीचे साम्राज्य आले आहे. त्यामुळे महापौर रवि लांडगे यांनी एकदा शरदनगर भागाचा दौरा करून येथील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरातील प्रमुख रस्त्यांच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र, मोठ्या रस्त्यांच्या विकासाच्या तुलनेत सोसायट्यांमधील अंतर्गत रस्त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे शरदनगरमधील परिस्थितीवरून दिसून येते.
गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. त्यानंतर कायमस्वरूपी डांबरीकरण करण्याऐवजी मुरूम टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. पावसाळ्यात याच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत होती.
आता पावसाळा संपूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नसल्याने दुचाकी वाहनांच्या वर्दळीमुळे धूळ उडत आहे. परिणामी, नागरिकांना दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवून राहण्याची वेळ आली आहे.
शरदनगर परिसरात नोकरदार आणि कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. नेवाळे वस्ती चिखली परिसरात दैनंदिन वस्तू घरपोच देणाऱ्या प्रमुख क्विक-कॉमर्स सेवा देणारी गोडाऊन आहेत. त्या सेवा देणारे दुचाकीस्वार अतिवेगाने गाडी चालवतात त्यामुळे नागरिकांना विशेषतः लहान व वृद्ध लोकांना जीव मुठीत धरून वावरावे लागते.
नागरिकांनी नियमित कर भरायचा, मात्र त्या बदल्यात मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी संघर्ष करायचा, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महापालिकेने मोठ्या रस्त्यांच्या विकासाबरोबरच अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नालाही समान प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत स्थानिक व्यक्त करत आहेत.
सिमेंट रस्ते करण्याची मागणी
शहरातील रस्ते विकासाच्या कामांना गती देण्याची भूमिका घेतली असेल, तर शरदनगरमधील रखडलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाकडेही तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन केवळ तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी रस्त्यांचे कायमस्वरूपी डांबरीकरण किंवा सिमेंट रस्ते करून स्थानिकांची समस्या सोडवावी अशी मागणी होत आहे.





