Pimpri-Chinchwad : शहरात हजारो फटाक्यांचे स्टॉल परवानगी मात्र मोजक्यांनाच
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमध्ये विनापरवाना फटाका स्टॉल्सवर धडक कारवाईचे आदेश

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात गेल्यावर्षी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर हजारो फटाक्यांची दुकाने लागली होती. मात्र अग्निशामक विभागाकडून केवळ १०५ जणांनाच ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले होते.
तसेच १ जानेवारी रोजी काळेवाडी येथील एका फटाक्याच्या दुकानाला आग लागल्यामुळे त्यावर असलेल्या रुग्णालयांतील रुग्णांचा जीव धोक्यात आला होता. त्यामुळे यंदाच्या वर्षी बेकायदेशीर फटाक्यांच्या दुकानांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र हे आदेश केवळ कागदावरच राहणार की त्याची अंमलबजावणी होणार, याकडे शहरावासियांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना आणि अनधिकृतपणे थाटल्या जाणाऱ्या फटाका स्टॉल्सविरोधात महापालिका प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. अग्निशमन विभागाचा ना हरकत दाखला आणि आवश्यक शासकीय परवानग्या न घेता फटाक्यांची विक्री करणाऱ्या स्टॉलधारकांवर तातडीने कारवाई करण्याचे थेट आदेश महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
दिवाळीच्या काळात शहरात मोठ्या प्रमाणावर तात्पुरते फटाका विक्री स्टॉल्स उभारले जातात. विस्फोटक अधिनियम २००८ च्या कलम ८४ मधील तरतुदींनुसार तात्पुरत्या स्वरूपातील फटाका विक्रीसाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी केवळ पक्के आरसीसी बांधकाम व शटर असलेल्या अधिकृत दुकान गाळ्यांमध्येच महापालिका अग्निशमन विभागाकडून तात्पुरता ना हरकत दाखला दिला जातो.
दरवर्षी प्रमाणे यंदाही पिंपरी आणि चिंचवडच्या मुख्य बाजारपेठेत फटक्यांची विक्री करण्याची जोरदार तयारी व्यापाऱ्यांनी केली आहे. बाजारपेठेत फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्यास मोठ्या प्रमाणात वित्त हानी होऊ शकते. तसेच जिवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
याच महिन्यात रुपीनगर येथील एका दुकानाच्या उद्घाटनासाठी आणलेल्या फटाक्यांना आग लागल्याची घटना घडली होती. तसेच काळेवाडी येथील फटाक्याच्या दुकानाला लागलेली आग लक्षात घेता महापालिका प्रशासन कशी कारवाई करणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे.
‘दरवर्षी शहराच्या विविध भागांत नियमांची पायमल्ली करत रस्त्यांवर अथवा मोकळ्या जागांवर अनधिकृत फटाका स्टॉल्स उभारत असल्याच्या तक्रारी अग्निशमन विभागाकडे दाखल होत असतात. अशा स्टॉल्सवर आग प्रतिबंधक सुरक्षेचा अभाव असल्याने मोठी दुर्घटना घडून जीवित व वित्तहानी होण्याचा धोका संभवतो. या संभाव्य धोक्यांची गंभीर दखल घेत शहरातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना लेखी आदेश जारी केले आहेत.
आपापल्या प्रभागात तत्काळ संयुक्त पाहणी मोहीम राबवून विनापरवाना फटाका विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच परवानग्या मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत फटाका विक्री सुरू होऊ देऊ नये, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.’ – व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त, अग्निशामक विभाग
महापालिका आणि पोलीस कर्मचारी यांची दिवाळी जोरात
दरवर्षी शहरात मोठ्या प्रमाणात गल्लोगल्ली फटाक्याचे स्टॉल उभारले जातात. या स्टॉल धारकांकडून मोठ्या प्रमाणात महापालिका आणि पोलीस कर्मचारी पैसे घेत असल्याने त्यांची दिवाळी जोरात असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. यामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
याकडे लक्ष देण्याच्या सूचना
फक्त पक्क्या गाळ्यांनाच मंजुरी: आरसीसी बांधकाम आणि शटर असलेल्या अधिकृत दुकानांनाच नियमानुसार परवाना.
सुरक्षेशी तडजोड नाही: आग अथवा इतर दुर्घटना टाळण्यासाठी विनापरवाना स्टॉल्सवर थेट जप्ती व कारवाईचा बडगा.
सर्व क्षेत्रीय कार्यालयांना अलर्ट: सर्व प्रभागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे बंधन.
आतापर्यंत ६८ अर्ज
आतापर्यंत परवानगी घेण्यासाठी ६८ अर्ज आले आहे. त्यापैकी ३३ जणांना परवानगी देण्यात आली आहे. तर २८ अर्जांवर प्रक्रिया सुरू आहे. त्यांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर त्यांना देखील परवानगी देण्यात येईल. व्यावसायिकांनी अग्निशमन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय फटाका स्टॉल्स उभारू नयेत असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
Mumbai News : मुंबईत 4.5 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; 4 जणांना अटक





