PCMC Mayor – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. २) अर्ज दाखल केला. तर त्यांच्यासोबत उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांनी अर्ज भरला आहे. महापौर पदासाठी फक्त लांडगे यांचा अर्ज आल्याने त्यांचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ते बिनविरोध महापौर झाले आहेत. त्याबाबतची घोषणा शुक्रवारी (दि. ६) महापालिका सभेमध्ये करण्यात येईल. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज दाखल केल्याने या पदासाठी सभागृहात निवडणूक घेण्यात येईल.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाचे सर्वाधिक ८५ नगरसेवक निवडून आले आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ इतके संख्याबळ आहे. त्यानुसार भाजपच महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. महापौर निवडीसाठी नगरसचिव कार्यालयामध्ये अर्ज स्वीकारण्यात आले. यामध्ये भाजपकडून महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा तर उपमहापौर पदासाठी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावेळी आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, उमा खापरे, भापजचे नवनिर्वाचित पक्षनेते प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. अर्ज भरण्यासाठी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र. या दोन तासांमध्ये महापालिकेमध्ये मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी रवी लांडगे तर उपमहापौर पदासाठी शितल उर्फ विजय शिंदे यांचे नाव जाहीर केले होते. मात्र, शितल शिंदे यांनी महापौर पद स्वीकारण्यास नकार दिला. दुपारी तीन वाजता ते महापालिका भवनमध्ये आले होते. मात्र, उपमहापौरपदासाठी नाव जाहीर होताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर रागातच ते महापालिका भवनमधून बाहेर पडले.दरम्यान, भाजपच्या शितल शिंदे यांनी उपमहापौर पदासाठी नकार दिल्याचे कळताच राष्ट्रवादी काँग्रेसने वैशाली काळभोर यांचा उमपहापौर पदासाठी अर्ज दाखल केला. पिंपरी चिंचवड महापौर काळभोर या प्रभाग क्रमांक १५ मधून निवडून आल्या असून त्या ज्येष्ठ आहेत. त्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने देखील सूत्रे फिरवली. दरम्यानच्या काळात शितल शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, शिंदे यांनी महापौर पद किंवा स्थायी समितीचे सभापती पदच पाहिजे असल्याचा हट्ट धरला. त्यानंतर दोन वेळा नगरसेविका झालेल्या शर्मिला बाबर यांना संधी देण्याचा निर्णय भाजपच्या वतीने घेण्यात आला. त्यानुसार, उपमहापौर पदासाठी भाजपकडून शर्मिला बाबर यांचा अर्ज भरण्यात आला. कोण आहेत रवी लांडगे? रवी लांडगे हे २०१७ मध्ये बिनविरोध निवडून आले होते. तर आताच्या निवडणुकीमध्ये देखील त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि भाजपचे माजी शहराध्यक्ष दिंवगत अकुंशराव लांडगे यांची राजकीय वादातून हत्या झाली. त्यानंतर कुटुंब आणि राजकीय वारसा सांभाळण्याची जबाबदारी रवी लांडगे यांच्या खांद्यावर आली. सन २००७ मध्ये त्यांच्यावर निवडणूक प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर २०१५ मध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्याचा फायदा २०१७ च्या निवडणुकीमध्ये भाजपाला झाला. सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत भोसरी विधानसभेसाठी महाविकास आघाडीला साथ दिली होती. त्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत घरवापसी केली. “पक्षाने महापौर पदावर संधी देत मोठी जबाबदारी दिली आहे. आगामी काळात शहर विकासाचे धोरण ठेवून महापालिका सभागृह चालवण्यास प्राधान्य देईल. तसेच आमच्या पक्षामध्ये कोणीही नाराज नाही.” – रवी लांडगे, महापौर पदाचे उमेदवार.