PCMC Election : प्रभागात महिला की पुरूष आरक्षण? आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेतील अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी), इतर मागासवर्ग (ओबीसी) तसेच, खुल्या गटातील या सर्व राखीव जागांवर महिलांसाठी असलेल्या जागेसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करा. असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेचा निवडणूक विभाग आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. त्यामधून प्रभागातील चित्र स्पष्ट होणार असल्याने इच्छुकांचे आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेच्या ४ सदस्यीय ३२ प्रभागांची रचना अंतिम झाली. त्यात एकूण १२८ जागा आहेत. त्यात केवळ सहा प्रभागात बदल करण्यात आले आहेत. लोकसंख्येसह एससी व एसटी लोकसंख्येची आकडेवारी बदलल्याने त्या वर्गाच्या आरक्षणात बदल झाले आहेत. त्यामुळे ज्या प्रभागात एससी व एसटीचे आरक्षण नव्हते, तेथेही हे आरक्षण पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या प्रभागाची आरक्षण सोडत कधी निघणार याकडे सर्व इच्छुकांच्या नजरा खिळल्या आहेत.
असे असताना राज्य निवडणूक आयोगाने याबाबत महापालिकेला आदेश दिले आहेत. आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून ही सोडत घेण्याचे आदेश दिले आहेत.एससीच्या २०, एसटीच्या ३ जागेनंतर ओबीसीसाठी ३५ जागांवर तसेच, खुल्या गटातील ३५ जागांवर महिलांचे आरक्षण पडणार आहे. प्रभागातील अ, ब, क आणि ड या जागा कोणाला सुटणार, एकूण १२८ पैकी महिलांसाठी कोणत्या प्रभागातील जागा सुटणार, याबाबत इच्छुकांसह माजी नगरसेवक व पदाधिकार्यांचे लक्ष लागले आहे. राखीव जागेवरील खुल्या गटात पुरूषांना लढता येते. मात्र, खुल्या गटातील जागेवर पुरुषांसोबत महिलांनाही लढता येते. त्यामुळे सर्व ३२ प्रभागाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे.
सोडतीनंतर हरकतीही मागविणार..
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढल्या जातात. महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांकडून पारदर्शक ड्रॅममधून चिठ्ठी काढली जाते. त्यानुसार त्या प्रभागात महिला व पुरूष असे आरक्षण निश्चित केले जाते. यंदा आरक्षण सोडतीवर हरकती व सुचाना स्वीकारण्यात येणार आहेत, तसे आदेश आयोगाने दिले आहेत.





