PCMC Election: मतदार एका प्रभागात आणि नाव भलत्याच ठिकाणी; मतदार यादीवरून राजकीय वातावरण तापले

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असून अनेक प्रभागातील मतदार भलत्याच प्रभागामध्ये टाकण्यात आले आहेत. प्रशासनाने राजकीय हेतूने प्रेरित होत हा कारभार केला असल्याची टीका होऊ लागली आहे. यामुळे निवडणुकीपूर्वी चांगलेच वातावरण तापले असून प्रशासनाला राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेच्या वतीने गुरूवारी (दि. २०) प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचे शहरातील ३२ प्रभागांनुसार विभाजन करण्यात आले आहे. हे करत असताना प्रशासनाने अनेक ठिकाणी मतदारांची नावेच यादीतून गायब केली आहेत. तर काही मतदार ज्या ठिकाणी राहतात त्याठिकाणी त्यांची नावे न टाकता भलत्याच प्रभागात टाकली आहेत.
यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सोमवारी (दि. २४) आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या शिष्टमंडळाने बैठक घेतली. यावेळी मतदारयाद्यांमध्ये झालेल्या घोळाचा मुद्दा प्रामुख्याने मांडण्यात आला. तसेच विधानपरिषदेचे आमदार अमित गोरखे यांच्या शिष्टमंडळाने देखील भेट घेतली.
आयुक्त हर्डीकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाका लावत त्यांना फैलावर घेण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी (दि. २२) आयुक्तांनी अधिकार्यांची बैठक घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदार याद्यांच्या झालेल्या घोळावरून चांगलेच झापले होते. तर सोमवारी (दि. २४) देखील आयुक्तांनी सायंकाळी उशिरा बैठक घेत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
मतदार याद्यांची करणार होळी
मतदार याद्यांमध्ये प्रशासनाने घातलेल्या गोंधळाबाबत महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी (दि. २५) पिंपरी चिंचवड महापालिकेवर आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी अकरा वाजता महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मतदारयाद्यांची होळी करण्यात येणार आहे. निवडणूक विभागाने शहरातील ३२ प्रभागांमधील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ घातला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी दिली.
“आम्ही आज आयुक्तांसोबत बैठक घेतली. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चुका झाल्या असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. राज्य निवडणूक आयोगाला याबाबत ते कळवणार असून हरकती व सूचना घेण्याची मुदत वाढवून घेऊ शकतात. तसेच आम्ही पत्रकार परिषद घेत आक्षेप नोंदवले होते. त्यावर त्यांनी किमान ॲप देत मतदारांना नावे शोधण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.”
– योगेश बहल, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट.





