PCMC Election: महापालिका निवडणुकीत रात्र थोडी सोंगे फार; अवधी कमी असल्याने सगळ्यांची दमछाक

प्रभात वृत्तसेवा
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी सोमवारी (दि. १५) आचारसंहिता जाहीर करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अवघ्या ३० दिवसांत सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे उमेदवारांच्या मुलाखती, निश्चिती, अर्ज स्वीकृती, माघार आणि प्रचार या सगळ्याच बाबींसाठी उमेदवारांसह पक्षांची मोठी धांदल उडणार आहे.
अवधी कमी असल्याने रात्र थोडी आणि सोंगे फार अशी अवस्था इच्छुकांची झाली आहे.राज्यातील काही महापालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका लांबणीवर पडणार असे चित्र निर्माण झाले होते.
परिणामी माजी नगरसेवक व इच्छुक काहीसे गाफील झाले होते; तसेच राजकीय पक्षांकडून देखील संथगतीने अंदाज घेत अर्ज स्वीकृती व मुलाखतीचे कामकाज सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी (दि. १५) महापालिका निवडणूक जाहीर केल्याने इच्छुक, माजी नगरसेवकांसह राजकीय पक्ष पुन्हा कामाला लागले आहेत.
उमेदवारांच्या मुलाखती घेणे, उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करून प्रदेश कार्यालयाकडे सादर करण्यासाठी पक्ष कार्यालयासह कोअर कमिटीची लगबग सुरू झाली आहे. निवडणूक तारखा जाहीर झाल्यानंतर लगचेच बैठकांचे सत्र सुरू होऊन मुलाखती पूर्ण करून संभाव्य उमेदवार यादी निश्चित करण्याच्या कामकाजाला कोअर कमिटीकडून सुरूवात करण्यात आली आहे.
भाजपची स्वबळाची तयारी
भारतीय जनता पार्टीने पिंपरी-चिंचवड महापालिकेत महायुती न करता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व १२८ जागांवर उमेदवार दिले जाणार आहे. काही जागा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाला सोडल्या जाणार आहेत. मात्र, त्या पक्षाचे उमेदवार भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढणार आहेत. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) हे पक्ष एकत्रित लढण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाली आहे.
महाविकास आघाडीकूडन वेट अँड वॉच
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे १०० पेक्षा अधिक अर्ज आले आहेत. त्यापेक्षा अधिक जण इच्छुक आहेत, संभाव्य उमेदवारांची यादीही तयार करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे यादी अंतिम करणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे १३० हुन अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.
लवकरच पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली जाणार आहे. काँग्रेस पक्षाकडे २५० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. पक्षाने सर्व १२८ जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीकडून उमेदवारी यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून इच्छुकांकडून अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. असे असले तरी महाविकास आघाडीमध्ये कोणते पक्ष सहभागी होतात त्यावर तिकीटांचा निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
आपची उमेदवार जाहीर करण्यात आघाडी
आम आदमी पार्टी सर्व १२८ जागांवर उमेदवार देणार आहे. पक्षाचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी सर्वांत प्रथम १५ उमेदवारांची यादी जाहीर करून आघाडी घेतली आहे. तसेच, वंचित बहुजन आघाडी, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि इतर पक्ष तसेच, संघटनांकडून इच्छुकांकडून अर्ज घेण्यात येत आहेत. तसेच, मुलाखतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. काहींनी अपक्ष लढण्याची तयारी सुरू केली आहे.




