PCMC Budget – प्रशासकीय राजवटीची छाप असलेले अंदाजपत्रक नवनियुक्त लोकप्रतिनिधींनी बदलले आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ४०० कोटींची वाढ करत सोमवारी (दि. १६) अंदाजपत्रकाला मान्यता दिली. या अंदाजपत्रकात उपसूचनाद्वारे कोट्यवधींच्या तब्बल अडीचशे कामांचा समावेश कऱण्यात आला आहे. तसेच प्रभागातील कामांसाठी देखील स्वतंत्र विकास निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या पहिल्याच बैठकीत आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा विविध योजनांसह ९ हजार ३२२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सादर केले होते. तीन वेळा अंदाजपत्रकाची बैठक तहकूब केल्यानंतर अखेर सोमवारी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. प्रशासकीय काळात काढलेल्या कामांचे दायित्व अधिक असल्यामुळे हर्डीकर यांनी नवीन कामे हाती न घेता जुन्या कामांवर भर दिला होता. तसेच जुन्याच प्रकल्पांचा अंदाजपत्रकात समावेश केला होता. त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर सत्तेत आलेल्या भाजपच्या नगरसेवकांची मोठी गोची झाली होती. महानगरपालिका अंदाजपत्रक ( संग्रहित छायाचित्र ) त्यांना दाखवायला देखील शहरात नव्याने प्रकल्प देण्यात आला नव्हता. मात्र, लोकप्रतिनिधींनी या अंदाजपत्रकात बदल केला आहे. अनेक नवीन कामे सुचवली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीने अंदाजपत्रकात आणखी ४०० कोटींची वाढ केली असून कोट्यवधींची कामे उपसूचनेने घुसविली आहेत. स्थायी समितीकडून प्रमुख तीन उपसूचना देण्यात आल्या असून त्याअंतर्गंत तब्बल चारशे कोटींची वाढ आणि सुमारे २५० कामांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. स्थायी समितीने मालमत्ता कर, बांधकाम कर व आकाशचिन्ह विभागातून उत्पन्न वाढ सूचविली आहे. प्रामुख्याने बंद जलवाहिनी, ड्रेनेज सुधारणा अशा प्रमुख बाबींचा समावेश आहे. दिलेल्या उपसूचनांपैकी ग्राह्य उपसूचनांसह अंदाजपत्रकात बदल केले जातील. त्यानंतर येत्या २४ मार्चला महापालिकेच्या विशेष सभेपुढे स्थायी समिती अध्यक्ष बारणे अंदाजपत्रकाचे सादरीकरण करतील. नगरसेवकांसाठी स्वतंत्र निधीची तरतूद नव्याने सत्तेत आलेल्या तसेच निवडून आलेल्या नगरसेवकांना प्रभागामध्ये काम करण्यासाठी देखील निधी नसल्याचे ओरड सुरू होती. तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने ते प्रभागात काय कामे करणार हा प्रश्न होता. मात्र, नगरसेवकांसाठी स्वतंत्र १० लाख रुपये निधीची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. तशी उपसूचना देण्यात आली आहे. “महापालिकेच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ४०० कोंटीची वाढ केली असून सुमारे अडीचशे कामे सुचविली आहेत. विविध विभागातून उत्पन्नवाढीचे पर्याय देखील समितीने दिले आहेत. प्रशासनाकडून हे बदल झाल्यानंतर हे अंदाजपत्रक येत्या २४ मार्चला महापालिकेच्या विशेष सभेत मांडण्यात येणार आहे.” – अभिषेक बारणे, अध्यक्ष, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका