PCMC Budget 2026 – पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शनिवारी (दि. २८ फेब्रुवारी) स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर केले. या अंदाजपत्रकावर स्थायी समितीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. चालू प्रकल्प, घटलेले उत्पन्न आणि वाढलेले दायित्व याची नेमकी माहिती प्रशासनाकडून मिळालेली नाही. त्यामुळे स्थायीच्या पहिल्या बैठकीत यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये यावर निर्णय होणार का ? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. महापालिकेचा आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांसह ९ हजार ३२२ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्त हर्डीकर यांनी स्थायी समितीपुढे सादर केले होते. त्यावेळी ही तहकूब बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत अंदाजपत्रकात काही बदल करून स्थायी समितीकडून त्याला मंजुरी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. अनेक नगरसेवकांनी उपसूचना देण्यासाठी स्थायी सभापतींकडे गर्दीही केली. परंतु, स्थायीने अंदाजपत्रकावरील निर्णय आणखी आठवडाभरासाठी लांबणीवर टाकला. अंदाजपत्रकात असंख्य जुनेच प्रकल्प आहेत. अनेक कामांमुळे दायित्व वाढलेले आहेत. विकासाच्या मुद्दा घेऊन निवडणूक लढलेल्या भाजपाला दाखविण्यासाठी देखील एकही नवीन प्रकल्प अंदाजपत्रकात नाही. तसेच उत्पन्नात देखील मोठी घट झाली आहे. बांधकाम परवानगी व करसंकलन विभागासह इतर विभागांचे देखील उत्पन्न घटले आहे. महानगरपालिका अंदाजपत्रक ( संग्रहित छायाचित्र ) याला जबाबदार कोण असा सवाल स्थायीच्या सदस्यांनी उपस्थित केला आहे. तसेच गेल्या वर्षभरात प्रशासनाने केलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती स्थायी समितीने मागितली आहे. तसेच, पालिकेचे उत्पन्नात घट दिसत असल्यामुळे वाढीसाठी काय उपाययोजना करता येतील, याची चाचपणी सुरू आहे. त्याबाबत प्रशासनाला सूचना देत अंदाजपत्रक तहकूब ठेवण्यात आले आहे. पुढील आठवड्यात बुधवारी (दि.११) अंदाजपत्रकाची बैठक होणार आहे. अंदाजपत्रकात जुन्याच कामांचा आयुक्तांनी गाजावाजा केला आहे. त्यामुळे नवीन कामांचा समावेश करण्यासाठी स्थायी समितीने वेळ वाढवल्याचे दिसून येत आहे. अंतिम मान्यतेसाठी हे अंदाजपत्रक महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर केल्यास याबाबतची स्पष्टोक्ती होणार आहे. उत्पन्न कमी दायित्व अधिक सध्या पालिकेवर दायित्व अधिक आहे. नवीन कामांपेक्षा आधीचे प्रकल्प पूर्ण करणे आणि पालिकेचे उत्पन्न वाढवण्यावर स्थायी समितीने प्राधान्य दिले आहे. वाकडसह उपनगरांतील कर संकलन वाढवणे आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून महसुलात भर टाकणे यावर भर देण्यात आला आहे. प्रशासकीय काळातील सुरू झालेली कामे आणि खर्चाचे दायित्व याबाबत अंदाजपत्रकातून आम्हाला स्पष्टता आलेली नाही. त्याची माहिती मागितली असून उत्पन्न वाढीबाबत विविध सूचना केलेल्या आहेत. या सगळ्याचा अंतर्भाव करून अंदाजपत्रकावर निर्णय घेण्यात येईल. याबाबत पुढील आठवड्यात होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत निर्णय घेण्यात येईल. – अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, पिंपरी-चिंचवड महापालिका