PCMC Action : जैववैद्यकीय कचरा उघड्यावर टाकणे भोवले; महापालिकेचा थेट ३५ हजारांचा दणका
PCMC Action : चिखलीतील सेक्टर १३ मध्ये जैववैद्यकीय कचरा टाकून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याप्रकरणी कडक कारवाई.

PCMC Action – उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकून पर्यावरण आणि सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘क’ क्षेत्रीय कार्यालयाने संबंधितांवर कठोर कारवाई करत ३५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्रमांक २ मधील सेक्टर १३, चिखली येथे उघड्यावर जैववैद्यकीय कचरा टाकण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट पर्यावरण प्रदूषणास कारणीभूत ठरत असून नागरिकांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण करू शकते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने तातडीने कारवाई करत संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली. जैववैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट ही पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल,
असे उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी यावेळी सांगितले. तर क्षेत्रीय अधिकारी अजिंक्य येळे म्हणाले की, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने जैववैद्यकीय कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे. नियमभंग करणाऱ्यांवर यापुढेही सातत्याने आणि कठोर कारवाई करण्यात येईल. क क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी योगेश फल्ले आणि मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक राहुल राखपसरे,
आरोग्य सहाय्यक अमोल घुसर तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांच्या पथकाने ही कारवाई केली. जैववैद्यकीय कचऱ्याची नियमबाह्य विल्हेवाट लावणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारे कठोर कारवाई सुरू राहणार असून पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.





