PCMC 52 Crore Scam : भाजपच्या सहभागाने ५२ कोटींचा दरोडा? महापालिकेत बोगस बिलांवरून रणकंदन..नेमकं काय घडलं?
PCMC 52 Crore Scam : बोगस उपसूचनांचा बनाव आणि कोट्यवधींची बिले लंपास; राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सत्ताधारी भाजपवर गंभीर आरोप.

PCMC 52 Crore Scam – पिंपरी-चिंचवड महापालिकेत बोगस उपसूचनांच्या माध्यमातून ५२ कोटींचा बिल घोटाळा झाला. या प्रकरणी लेखा व वित्त अधिकारी प्रवीन जैन यांची चौकशी सुरू केली असली, तरी त्यांच्यासह काही अधिकारी, ठेकेदार आणि नगरसेवकांच्या सहभागातून हा भ्रष्टाचार झालेला आहे. या संपूर्ण प्रकरणात सत्ताधाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यामध्ये कोणाचा हात आहे ?
हा शोध चौकशीतून घेतला जावा, अशी मागणी विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून शुक्रवारी (दि. १०) करण्यात आली आहे. स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणेंनी मुख्य लेखाधिकारी प्रवीण जैन यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत या बिल घोटाळ्याचा भांडाफोड केला. या प्रकरणी आयुक्तांनी चौकशी सुरू केली. दरम्यान, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे यांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची मागणी केली.
भोईर यांनी म्हटले आहे की, हा प्रकार म्हणजे पालिकेच्या तिजोरीची लुट आहे. महापालिका ही करदात्या नागरिकांच्या पैशाची विश्वस्त आहे. जर अशा प्रकारे बोगस कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची लूट होणार असेल, तर प्रशासनावरील विश्वास उडेल. या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत प्रशासन पोहोचणे आवश्यक आहे. आयुक्तांनी या मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास नागरिकांच्या हितासाठी या प्रकरणाविरोधात तीव्र कायदेशीर लढा उभारण्यात येईल, असा इशाराही भोईर यांनी दिला.
सुलभा उबाळे यांनीही भ्रष्टाचारात भाजपचा हात आहे का?, अशी शंका उपस्थित करत टीका केली. त्या म्हणाल्या, ज्या ठेकेदारांना बिलं अदा केली, ते सत्ताधारी आमदारांचे निकटवर्तीय असणारे आहेत. हे पाहता केवळ प्रवीण जैन यांची नव्हे तर ठेकेदार, सह्या करणारे नगरसेवक आणि त्यांना ज्यांनी सह्या करायला लावल्या, त्या सर्वांची चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळणा-या सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांचा संबध नाही
य़ा बोगस उपसूचनांवर भाजपसह राष्ट्रवादी, शिवसेना नगरसेवकांच्या सह्या असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष बारणेंनी म्हटले होते. मात्र, पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी आणि शिवेसनेने हे आरोप खोडून काढले. त्यांनी वादग्रस्त उपसुचनांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीतील एकही नगरसेवकांची सही नाही. केवळ भाजपच्या नगरसेवकांच्या सह्या आहेत, असेही भाऊसाहेब भोईर व सुलभा उबाळे यांनी स्पष्ट केले.






