PCMC 52 Crore Scam : पिंपरी पालिकेत खळबळ! चौकशीचा फास आवळला; मुख्य वित्त अधिकारी सक्तीच्या रजेवर
PCMC 52 Crore Scam : मागील तीन वर्षांतील सर्व संशयास्पद व्यवहारांची होणार चौकशी; मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे सोपवला अतिरिक्त पदभार.

PCMC 52 Crore Scam – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागातील ५२ कोटींच्या बिल घोटाळ्याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात गंभीर आरोप असलेले मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचे आदेश आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यांच्या लेखा विभागाचा अतिरिक्त कार्यभार मुख्य लेखा परीक्षक प्रमोद भोसले यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत.
आदेशात म्हटले आहे की, सन २०२५-२०२६ चे सुधारित व सन २०२६-२०२७ चे मूळ अंदाजपत्रकातील तरतुदींमध्ये वाढ/घट करून करण्यात आलेल्या बिल अदायगी तसेच मागील तीन वर्षांतील तत्सम प्रकरणांची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत ९ एप्रिल २०२६ रोजी चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आलेली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य, वित्तीय शिस्तीशी संबंधित बाबींचा विचार करता, चौकशी निष्पक्ष, पारदर्शक व प्रभावीपणे पार पाडण्यासाठी महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा संचालक (वित्त) प्रवीण जैन यांना पुढील आदेश होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठविण्यात येत आहे. तसेच चौकशी प्रक्रियेत कोणताही प्रभाव पडू नये व कार्यालयीन कामकाज सुरळीत राहावे यासाठी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार पुढील आदेशापर्यंत प्रमोद भोसले, मुख्य लेखा परीक्षक यांच्याकडे सोपविण्यात येत आहे.





