Mantralaya Bribe Case : मोठी बातमी..! मंत्रालयात लाचखोरीचा भंडाफोड; 6.37 लाखांची लाच घेताना बडा अधिकारी जाळ्यात
Mantralaya Bribe Case : मंत्रालयातील अर्थ व नियोजन विभागाचे कक्ष अधिकारी विलास लाड यांना ६ लाख ३७ हजार रुपयांची लाच घेताना खारघरमध्ये अटक करण्यात आली आहे.

Mantralaya Bribe Case : राज्याच्या प्रशासकीय केंद्रस्थानी असलेल्या मंत्रालय येथे लाचखोरीचे आणखी एक मोठे प्रकरण समोर आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना रंगेहाथ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामविकास विभागाचा निधी मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने तब्बल 6 लाख 37 हजार रुपयांची लाच मागितली होती. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) यांनी खारघर परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
मंत्रालयातील लाचखोरीवर लगाम घालण्यासाठी एसीबीकडून सलग कारवाया सुरू आहेत. मार्च महिन्यातही अशाच प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या. आता एप्रिलच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मोठी कारवाई झाल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिकाच्या वर्षभराच्या उत्पन्नाएवढी रक्कम लाच म्हणून स्वीकारली जात असल्याने सरकारी व्यवस्थेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामुळे मंत्रालयातील कामकाजाच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
दरम्यान, या कारवाईनंतर संबंधित अधिकाऱ्याविरोधात पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून एसीबीकडून अधिक तपास केला जात आहे.





