Asia Cup Trophy : अखेर पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वींनी मानली हार, सुपूर्द केली आशिया कप २०२५ ची ट्रॉफी

Mohsin Naqvi and PCB ready to hand over Asia cup trophy : भारतीय संघाने आशिया कप २०२५ चे विजेतेपद पटकावल्यानंतर ट्रॉफीवरून निर्माण झालेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. पीसीबी आणि त्यांचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांना भारताच्या दबावापुढे झुकावे लागले असून, आशियन क्रिकेट परिषदेने (एसीसी) आशिया कप २०२५ची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाला सुपूर्द केली आहे. लवकरच ही ट्रॉफी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) हस्तांतरित केली जाणार आहे.
भारताने घेतली ठाम भूमिका –
२८ सप्टेंबर रोजी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ गडी राखून पराभूत करत आशिया कपचे जेतेपद पटकावले. मात्र, ट्रॉफी प्रदान समारंभात पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांनी ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर येण्याचा प्रयत्न केला. भारतीय संघाने स्पष्टपणे सांगितले की, ते मोहसिन यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. यानंतरही नकवी स्टेजवर थांबले आणि नंतर ट्रॉफी घेऊन निघून गेले, ज्यामुळे वादाला तोंड फुटले.
एसीसीच्या बैठकीत नक्वींना सुनावले खडे बोल –
मंगळवारी दुबईत झालेल्या एसीसीच्या बैठकीत बीसीसीआयचे प्रतिनिधी राजीव शुक्ला आणि आशीष शेलार यांनी मोहसिन नक्वी यांना चांगलेच खडसावले. त्यांनी स्पष्ट केले की, भारताने आशिया कप जिंकला असून, ट्रॉफीवर त्यांचा पूर्ण हक्क आहे. ती तातडीने भारताला देण्यात यावी, अन्यथा बीसीसीआय ही बाब आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) नेण्याची तयारी करत आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
हेही वाचा – IND A vs AUS A : श्रेयस अय्यरचं दमदार कमबॅक! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघ्या ‘इतक्या’ चेंडूत झळकावले वादळी शतक
पाकिस्तानला मानावी लागली हार –
अखेर भारताच्या दबावापुढे पीसीबी आणि एसीसीला झुकावे लागले. एसीसीने एशिया कपची ट्रॉफी यूएई क्रिकेट बोर्डाकडे सुपूर्द केली असून, ती लवकरच बीसीसीआयला दिली जाणार आहे. भारताची मागणी फक्त इतकीच होती की, मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारली जाणार नाही. जर एसीसीने २८ सप्टेंबर रोजीच हा निर्णय घेतला असता, तर हा वाद इतका वाढलाच नसता.
भारताची रणनीतिक विजय –
एशिया कपच्या जेतेपदासह भारताने रणनीतिकदृष्ट्याही यश मिळवले आहे. बीसीसीआयच्या ठाम भूमिकेमुळे आणि एसीसीच्या अंतिम निर्णयामुळे भारताने मैदानाबाहेरही पाकिस्तानला चारही बाजूंनी पराभूत केले आहे.





