Pune Ganesh Festival 2025 : पुण्यातील मंडळांनी लक्ष द्या! सांस्कृतिक मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक, कोणते मोठे निर्णय झाले? जाणून घ्या…

Pune Ganesh Festival 2025 : २८ अॅागस्टला सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सार्वजनिक मंडळांची तयारी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. कालच राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली काल पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत गणेश उत्सवासंदर्भात काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
खरंतर नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात गणेशउत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली होती. काल झालेल्या बैठकीत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांबाबत आढावा घेतला. त्या दृष्टीने गणेश मंडळांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
या बैठकीत गणेश मंडळांसाठी आवश्यक आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांना प्रशासनाकडून मान्यता देण्यात आली असल्याची माहिती कसबा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातात झालेल्या बैठकीत पुणे महापालिका आयुक्त, पुणे पोलीस आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, एमएससीबी आणि पीएमआरडी तसेच इतर सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार
गणेशोत्सवाच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आहे. येणाऱ्या काळात गणेशोत्सवात घ्यावयाची काळजी या संदर्भातील विषय बैठकीत प्रस्तापित करण्यात आले. ११ कोटी रुपयांची बक्षिसे गणेशउत्सव काळात संपूर्ण राज्यभर स्पर्धा घेऊन दिली जाणार आहेत. तसेच २ हजार भजनी मंडळांना साहित्याचे वाटप केले जाणार आहे. वेगवेगळ्या पद्धताने हा उत्सव राष्ट्रीय पातळीवर नेण्याकरिता राज्य सरकार विशेष प्रयत्न करणार आहे, अशी माहिती रासने यांनी दिली.
काय म्हणाले आमदार हेमंत रासने?
हा राज्य महोत्सव व्हावा, असा प्रस्ताव मी विधानसभेत मांडला होता. गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो मी मांडलेला प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारने त्वरित मान्यता दिली. गणेश उत्सव मंडळांना १२ वाजेपर्यंतची परवानगी सात दिवस मिळणार आहे, ती अगोदर पाच दिवस होती. जिल्हाधिकाऱ्यांनी चौथा आणि नववा दिवस वगळून इतर दिवशी मान्यता दिली आहे. गणेशमंडळांना एमएसीबीकडे परवागी घ्यावी लागत होती, त्याबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
View this post on Instagram
कोणते निर्णय घेण्यात आले?
ध्वनीक्षेपक परवानगी : सात दिवस रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी (चौथा व नववा दिवस वगळून).
विद्युत परवानगी : दरवर्षी नवीन कागदपत्रांची अट शिथिल; गेल्या वर्षीची परवानगी ग्राह्य धरली जाणार.
वीजदर आकारणी : टप्प्याटप्प्याने दर न आकारता एकसमान आकारणी केली जाणार.
उत्सव निर्बंधमुक्त : साऊंडवरील नियम पाळून २४ तास उत्सव सुरू रहावा, मंडप बंद करायला लावले जाऊ नये, तसेच राज्यभरातून येणाऱ्या भक्तांसाठी हॉटेल खुली रहावी. या महत्त्वपूर्ण मागण्या मान्य करण्यात आल्याने गणेशोत्सव खऱ्या अर्थाने उत्साहात आणि निर्बंधमुक्त पद्धतीने साजरा होणार आहे.





