पुणे जिल्हा | पवारांचे लक्ष्य छत्रपती कारखाना?

इंदापूर, {नीलकंठ मोहिते} – भवानीनगर (ता. इंदापूर) येथील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सत्तेच्या चावी वर्षानुवर्षे या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हाती आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे या पहिल्यांदा गुरुवारी (दि. 6) रात्री इंदापुरात पोहोचल्या आणि छत्रपती सहकारी साखर कारखाना पूर्ण ताकतीने लढवायचा आहे आणि जिंकायचा आहे,
अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, पवारांच्या करिष्म्याने हा कारखाना जर अजित पवार यांच्या हातून निसटणार का, की अजितदादांचा करिष्मा चालणार हे निवडणुकीत समजेल मात्र तोपर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेतच रहावे लागेल.
अजितदादांची राजकीय ताकद इंदापूर, बारामती नव्हे तर राज्याला चांगली माहिती होती; मात्र या राजकीय ताकतीची हवा लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी काढून घेतलेली आहे.
इंदापूर तालुक्यात तर लोकसभेला विळा भोपळ्याचे वैर असलेले आमदार दत्तात्रय भरणे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत अजित पवारांच्या विचाराला साथ देत सुनेत्रा पवारांचा मनापासून प्रचार केला; परंतु हाती भोपळा लागला अशी परिस्थिती निवडणुकीच्या निकालानंतर दिसली.
इंदापूर तालुक्यात पवारांची जादू राजकीय चालते हे लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालावरून प्रत्येक सामान्य माणसाला कळाले आहे. छत्रपती सहकारी साखर कारखाना हा देखील शरद पवारांच्याच मार्गदर्शनाखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात ठेवत होते.
यामध्ये आमदार भरणे यांची प्रचंड साथ अजित पवारांच्या पाठीशी आजपर्यंत आहे. लोकसभेचा निकाल झाल्यापासून गावोगावी राजकीय चित्र वेगळे निर्माण झाले आहे. कोणत्याही राजकीय नेत्याची ताकद या निकालाने गावात ठेवलेली नाही. त्यामुळे यंदा कारखानाही अजित पवारांना मात देणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
वेगळा इतिहास लिहला जाणार?
छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या याद्या जाहीर झाले आहेत. आता काही दिवसांवर येथील निवडणूक आलेली आहे. त्यामुळे या साखर कारखान्याच्या इतिहासात आणखी वेगळा इतिहास या निवडणुकीच्या रूपाने जनतेला, सभासदांना पाहण्यास मिळणार आहे.





