“आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार…’; भोजपुरी स्टार पवन सिंह यांची पलटी

Pawan Singh – भोजपुरी स्टार पवन सिंह देखिल लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची बऱ्याच काळापासून चर्चा आहे. मात्र आतापर्यंत केवळ अंदाज वर्तवले जात होते. आता पवन सिंहने स्वत: ट्वीट करत आपण निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोणत्या राज्यातून आणि कोणत्या मतदारसंघातून लढणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
आपला समाज आणि आईला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी निवडणूक लढवणार आहे. तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि सहकार्य मला अपेक्षित आहे असे त्याने म्हटले आहे. प. बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीकडून पवन सिंह निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बातमी होती.
त्यानंतर त्याने आपण लढणार नसल्याचे सांगत माघार घेतल्याचीही बातमी होती. मात्र आता त्याने स्वत: आपण लढणार असल्याचे ट्वीट करत आपला इरादा व्यक्त केला आहे. सध्या त्यांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे. । Pawan Singh । Lok Sabha Election 2024
मैंअपने समाज जनता जनार्दन और माँ से किया हुआ वादा पूरा करने के लिए चुनाव लडूँगा
आप सभी का आशीर्वाद एवं सहयोग अपेक्षित है
जय माता दी— Pawan Singh (@PawanSingh909) March 13, 2024
एका मुलाखतीत पवन सिंह म्हणाला की, आसनसोल येथून तो लढणार नाही. मात्र याच वेळी त्याने असे काही संकेत दिले की त्यावरून तो आरा या त्याच्या स्वत:च्या गावातूनच लढण्याची तयारी करतो आहे. माझ्या होमटाउनमधूनच (आरा) मी निवडणूक लढवावी अशी प्रत्येकाची इच्छा आहे.
तेथून लढावे आणि आपल्या भागासाठी मी काही करावे असे प्रत्येकाला वाटते असे सांगतानात अन्य कोणत्या मतदारसंघातून आपली लढण्याची इच्छा आहे त्याचे संकेतही पवन सिंहने दिले. आरा, छपरा, महाराजगंज, वाल्मिकी नगर आणि औरंगाबाद या मतदारसंघांची नावे त्याने घेतली.
शेजारच्या उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यातूनही लढण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. आता भाजपकडून पवन सिंहला कोणत्या मतदारसंघाचे तिकिट दिले जाते ते लवकरच स्पष्ट होईल. भोजपुरी चित्रपटसृष्टीचे अन्य तीन सुपरस्टार अगोदरच भाजपचे खासदार आहेत.
त्यात मनोज तिवारी, रवि किशन आणि दिनेश यादव उर्फ निरहुआ यांचा समावेश आहे. मनोज तिवारी दिल्लीतून तर रवि किशन योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी झाले आहेत. Pawan Singh । Lok Sabha Election 2024





