Pawan Khera : निवडणूक आयोगाने फेटाळल्या 89 लाख तक्रारी; काँग्रेसचा मोठा दावा

पाटणा : बिहारमधील मतदार याद्या पडताळणीवर कॉंग्रेसने रविवारी पुन्हा तीव्र आक्षेप घेतला. पडताळणीतील अनियमिततांविषयी आम्ही तब्बल ८९ लाख तक्रारी नोंदवल्या. मात्र, त्या सर्व तक्रारी फेटाळण्यात आल्या, असा दावा त्या पक्षाने केला. तसेच, संपूर्ण पडताळणी प्रक्रिया पुन्हा राबवण्याची आग्रही मागणीही केली. बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्या राजकीय रणसंग्रामाच्या तोंडावर निवडणूक आयोगाने मतदार याद्यांची पडताळणी केली. त्या प्रक्रियेला प्रारंभापासून विरोधी पक्षांची इंडिया आघाडी तीव्र विरोध करत आहे.
मतदारांना मोठ्या संख्येने मतदानाच्या हक्कापासून दूर ठेवण्यासाठी ती प्रक्रिया राबवण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी वारंवार केला. मात्र, तो आरोप फेटाळत निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार याद्या जाहीर केल्या. त्यामुळे विविध कारणांवरून ६५ लाख मतदारांची नावे याद्यांमधून वगळण्यात आल्याचे स्पष्ट झाले. प्रारूप याद्यांविषयी दावे आणि हरकती दाखल करण्यासाठीची मुदत समाप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने नव्याने भूमिका मांडली. त्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी पाटण्यात पत्रकार परिषद घेतली.
कुठल्याही राजकीय पक्षाकडून तक्रारी आल्या नसल्याच्या बातम्या निवडणूक आयोग सुत्रांच्या माध्यमातून पेरत आहे. खरेतर, कॉंग्रेसच्या बुथस्तरीय एजंटांनी (बीएलए) ८९ लाख तक्रारी दिल्या. मात्र, त्या स्वीकारण्यात आल्या नाहीत. राजकीय पक्षांच्या नव्हे; तर केवळ व्यक्तिगत स्वरूपाच्या तक्रारी स्वीकारल्या जातील असे आमच्या एजंटांना सांगण्यात आले, असा आरोप त्यांनी केला. मतदार याद्या पडताळणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्या. त्या निवडणूक आयोगाच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली.
बिहारमधील ९० हजार ५४० मतदान केंद्रांवरील ६५ लाख मतदारांची नावे याद्यांमधून वगळण्यात आली. अनेक मतदारांना २ ओळखपत्र क्रमांक देण्यात आले. त्यासंबंधीच्या पावत्याही आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे आम्ही दिलेल्या आकडेवारीची, माहितीची छाननी होणे गरजेचे आहे. संबंधित चुका दुरूस्त करण्यासाठी पुन्हा घरोघर जाऊन सत्यशोधन व्हायला हवे, असे आग्रही प्रतिपादन खेडा यांनी केले.





