Pawan Kalyan | Mark Shankar | Narendra Modi : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि जनसेना पक्षाचे अध्यक्ष पवन कल्याण यांचे धाकटे पुत्र मार्क शंकर सिंगापूरमधील एका शाळेत लागलेल्या आगीच्या घटनेत जखमी झाले आहेत. या अपघातात त्याच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर त्याला सिंगापूरमधील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलाच्या आगीत जखमी होण्याच्या वृत्तानंतर पवन कल्याण तातडीने सिंगापुरसाठी रवाना झाले. यानंतर त्यांनी मुलाच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान, अशातच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पावन कल्याण यांना फोन करून मुलाच्या प्रकृतीबद्दल विचारणा केली आहे. पवन कल्याण म्हणाले की, “मुलाच्या जखमी होण्याची बातमी कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना फोन केला होता. यामुळे मला धैर्य मिळाले. तसंच त्यांनी उच्चायुक्तांना सिंगापूरमध्ये मदत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.” तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधल्याचे पवन कल्याणने सांगितलं. त्याचबरोबर पवन कल्याणने त्याच्या मुलासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभारही मानले आहेत. मार्क शंकरची प्रकृती आता कशी आहे? जनसेना पक्षाने एक पोस्ट करत मार्क शंकरच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. त्यानुसार पोस्टमध्ये “शंकर यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. चांगली गोष्ट म्हणजे त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे.” मार्क शंकरचा जन्म १० ऑक्टोबर २०१७ रोजी झाला होता. तो आता फक्त ८ वर्षांचा आहे आणि सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. सोशल मीडियावर लोक शंकरच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. नेमकं काय घडलं? ८ एप्रिल रोजी सिंगापूरच्या रिव्हर व्हॅली रोडवरील एका दुकानात आगीची घटना घडली. जिथे मुलांसह अनेक जण आगीत अडकले. जखमींमध्ये पवन कल्याणचा आठ वर्षांचा मुलगा मार्क शंकर होता. धुराच्या संपर्कात आल्यामुळे त्याचे हातपाय भाजले आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि आता त्याच्या प्रकृती सुधारणा होत आहे.