Pawan Kalyan : सलमान खाननंतर आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडवर

Pawan Kalyan : गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून टार्गेट करत आहे. नुकतेच सलमान खानच्या जवळचे समजले जाणारे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली. तसेच सलमान खानचे वडील सलीम खान यांना देखील धमकी देण्यात आली होती.
दरम्यान, अश्यातच आता दाक्षिणात्य विश्वातील प्रसिद्ध अभिनेते आणि आंद्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री ‘पवन कल्याण’ यांना देखील जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. एकीकडे सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या लोकप्रिय सेलिब्रिटींना जीवेमारण्याची धमकी मिळत आहे, तर दुसरीकडे राजकारणात सक्रिय असणाऱ्या व्यक्तींना देखील जीवेमारण्याची धमकी मिळत आहे.
पवन कल्याण यांना धमकीचा फोन आला असून, जिथे दादागिरी करत शिवीगाळ करत उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. धमकी पाठवणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. त्यामुळे या घटनेमागे नेमका कुणाचा हात आहे अद्याप समोर आलेलं नाही.
पवन कल्याण यांच्या जनसेवा पार्टीच्या ट्विटर हँडलवरूनही एक पोस्ट करण्यात आली. ‘मोबाईलवर धमकीचा कॉल आला. उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एका अनोळखी क्रमांकावरून धमकीचा फोन आला की त्यांना मारून टाकलं जाईल. यानंतर शिवीगाळ करणारे अनेक मेसेजही आले. असं यामध्ये सांगण्यात आलं आहे.





