Pavana Pipeline Project: मावळात पुन्हा पेटणार पाण्याचा संघर्ष! पवना बंदिस्त जलवाहिनीविरोधात २ ऑक्टोबरला ‘लॉग मार्च’
Pavana Pipeline Project: पिंपरी-चिंचवडला पाणी देण्यास विरोध नाही, मात्र बंदिस्त पाइपलाइनमुळे नदीचा नैसर्गिक प्रवाह धोक्यात येण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भीती.

Pavana Pipeline Project – पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहरासाठी प्रस्तावित बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात मावळातील शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली २ ऑक्टोबर रोजी हजारो शेतकऱ्यांच्या सहभागाने लॉन्ग मार्च काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
राजू शेट्टी यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणी देण्यास कोणताही विरोध नाही. मात्र नदीपात्राऐवजी बंदिस्त पाइपलाइनद्वारे पाणी नेण्याच्या निर्णयाला शेतकरी आणि ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पामुळे पवना नदीचा नैसर्गिक प्रवाह बाधित होईल. तसेच शेती आणि मावळातील गावांच्या पिण्याच्या पाण्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.
याच प्रश्नावर यापूर्वी झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्या ऐतिहासिक ठिकाणाहूनच २ ऑक्टोबर रोजी पवना धरणाच्या दिशेने लॉन्ग मार्च काढण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले. यावेळी शेतकरी नेत्यांनी आरोप केला की, या प्रकल्पाच्या माध्यमातून काही लोकप्रतिनिधींना शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची संधी मिळणार असून विकासाच्या नावाखाली जनहिताकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ५६ वर्षांपासून प्रलंबित असल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक पिढ्यांपासून न्यायासाठी संघर्ष सुरू असतानाही शासनाने ठोस निर्णय घेतलेला नसल्याचा आरोप करण्यात आला. पवना धरण परिसरातील शेकडो एकर जमीन उद्योगपतींना भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
धरणग्रस्तांना न्याय नाकारला जात असताना उद्योगपतींना प्राधान्य दिले जात असल्याने मावळात संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते योगेश पांडे, प्रकाश बालवडकर, ज्ञानदेव सोनवणे, धरणग्रस्त संयुक्त संघटनेने अध्यक्ष नारायण बोडके, जमीन हक्क परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदेव सोनवणे, अमित कुंभार, भरत मोरे आदी उपस्थित होते.






