प्रभात वृत्तसेवा पौड – महसूल कर्मचारी संघटनेच्या आवाहनानुसार आज घेतलेल्या एक दिवसीय राज्यव्यापी संपामुळे मुळशी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष बंद ठेवण्यात आला. परिणामी, संपूर्ण तालुक्यातील कानाकोपऱ्यातून दस्तऐवजांसंबंधी कामांसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली.महसूल सेवकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. या आंदोलनात मुळशी तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांना महसूल सेवक संघटना अध्यक्ष चंद्रकांत हुलावळे, खजिनदार गणेश पवार, अमित भंडलकर, प्रकाश दिघे, बाप्पू महाडिक, गुलाब भिंगारे, संतोष चांदेरे, प्रशांत रोकडे यांनी सादर केले. संपामुळे दिवसभर नागरिकांना अभिलेख तपासणी, प्रमाणपत्रे, उतारे, नोंदी आदी कामांसाठी भटकंती करावी लागली. अनेकांनी अचानक बंद पडलेल्या सेवेमुळे नाराजी व्यक्त केली.