पौड पंचायत समितीमध्ये सूचना फलक नसल्याने दिव्यांग व्यक्तीचा अपघात

पौड (ता. मुळशी) : पंचायत समितीच्या आवारात लावण्यात आलेल्या वाहन थांबा गेटला कोणताही सूचना फलक अथवा सुरक्षा रक्षक नसल्याने एका दिव्यांग व्यक्तीचा अपघात झाला. संबंधित दिव्यांग व्यक्ती नेहमीप्रमाणे कामानिमित्त पंचायत समितीत आले होते, यावेळी ही घटना घडली.
आवारातील वाहन थांबा गेट दिसून न आल्याने ते त्यास धडकले. या धडकेत त्यांच्या मानेला दुखापत झाली तर त्यांच्या मागे बसलेले वयस्कर व्यक्ती खाली पडले. त्यामुळे त्यांनाही मुका मार बसला. सुदैवाने गंभीर इजा टळली असून डोक्याला किंवा चेहऱ्याला गंभीर मार लागला नाही. अपघातानंतर उपस्थित नागरिकांनी तात्काळ त्या व्यक्तींना दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त करण्यात आला.
पूर्वी या ठिकाणी वाहन थांबा गेट कायम खुला असल्याने नागरिक पंचायत समिती आवारात वाहने लावत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांच्या सूचनेनुसार, आवारात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या अडचणींना आळा घालण्यासाठी हा गेट बसविण्यात आला. तथापि, या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत असून अपघातही घडत आहेत.
नागरिकांची मागणी काय?
पंचायत समितीच्या वतीने गेटवर एक सुरक्षा रक्षक नेमावा, त्या ठिकाणी सूचना फलक लावावा, रात्रीच्या वेळी गेटवर रेडियम पट्टी किंवा लाईटची व्यवस्था करावी नागरिकांचे म्हणणे आहे की, या उपाययोजना तत्काळ केल्यास अशा प्रकारचे अपघात टाळता येतील आणि सर्वसामान्यांना सुरक्षितता मिळेल.





